Published On : Thu, Oct 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लाकूड चोरट्याचा वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला! दोन्ही हातांवर वार

गंभीर जखमी नागपूर मेडिकलमध्ये दाखल
Advertisement

Auto Draft

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जंगलातून सागवानाचे लाकूड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला थांबवून विचारणा केल्याने संतप्त झालेल्या आरोपीने वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वनमजूर एकनाथ भोयर यांच्या दोन्ही हातांवर कुऱ्हाडीचे घाव लागले असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेच्या एका तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सागवानाचे लाकूड नेताना वनमजुराने थांबवले
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील सत्रापूर शिवारात बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरडा येथील रहिवासी प्रकाश जयपत परतेती हे सायकलवरून सागवानाचे लाकूड घेऊन जात असल्याचे वनमजूर एकनाथ भोयर यांच्या निदर्शनास आले. भोयर यांनी त्यांना थांबवून लाकूड कुठून आणले, अशी विचारणा केली. तसेच ते घटनेचे छायाचित्र घेत असताना संबंधित व्यक्ती संतप्त झाली आणि त्याने भोयर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची माहिती आहे.

दोन्ही हातांवर कुऱ्हाडीचे घाव
आरोपीच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वनमजूर एकनाथ भोयर यांनी दोन्ही हात वर केले. मात्र, या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांवर कुऱ्हाडीचे घाव लागले आणि ते गंभीर जखमी झाले.

Advertisement

जखमी भोयर यांना तातडीने रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वनविभाग आणि पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पारशिवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डोणेकर, पोलीस हवालदार संदीप नागोसे आणि हरीश यंगलवार यांनी गावकऱ्यांच्या मदतीने कारवाई केली.

घटनेच्या एका तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड आणि सायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारशिवणी पोलीस आणि वनविभाग करीत आहेत.

वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जंगलातील लाकूड चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनमजुरावरच कुऱ्हाडीने हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनसंपत्तीचे संरक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.