Published On : Wed, Aug 29th, 2018

नागपुरातील शाश्वत शहरी गतीशीलतेवरील दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) व युरोपियन युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपुरातील ‘शाश्वत शहरी गतीशीलतेला प्रोत्साहन’ (प्रमोटींग सस्टेनेबल अर्बन मोबिलीटी इन नागपूर) या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचा बुधवारी (ता. २९) समारोप झाला.

कार्यशाळेच्या समारोप समारंभात नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे लिड ट्रान्सपोर्ट स्पेशॅलिस्ट अर्नाड डॉफीन, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे ग्रँट ऑफिसर जतीन अरोरा, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प अधिकारी रजनीश अहुजा, महामेट्रोचे सह महाव्यवस्थापक महेश गुप्ता यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, महा मेट्रो, नीरीचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

‘मोबिलाईज युवर सिटी’ (एमवायसी) उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नागपूरसह अहमदाबाद व कोची शहराची निवड करण्यात आली आहे. नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी युरोपीयन युनियनतर्फे शहराला आठ कोटींची मदत केली जाणार असून एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटतर्फे प्रकल्पासाठी तांत्रिक मदत केली जाणार आहे. यासंदर्भात विविध संस्था, संघटनांसह चर्चा करून प्रकल्पाबाबत नवनवीन संकल्पनांवर कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेमध्ये एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड यांनी सादरीकरणाद्वारे उपक्रमाची संकल्पना पटवून दिली. कार्यशाळेत दोन्ही दिवसांच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये विविध विषयांवर विस्तृत चर्चा करून त्याबाबत नागरिकांच्या सूचनाही त्यांनी मागविल्या. .

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवने यांनी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी स्मार्ट सिटीची संकल्पना विषद केली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट, युरोपियन युनियन, नागपूर सुधार प्रन्यास, महा मेट्रो, नीरी यांच्या सहभागी सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.