Published On : Fri, Jul 30th, 2021

बुधवारी नागपूर शहरात ७९७९ घरांचे सर्वेक्षण

Advertisement

मनपा आयुक्त, आरोग्य सभापती, झोन सभापती, अतिरिक्त आयुक्तांनी घेतला डेंग्यू संदर्भात आवश्यक उपाययोजनांचा आढावा

नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. या अंतर्गत घरांघरांमध्ये जाउन मनपा पथकाद्वारे तपासणी केली जाते व डेंग्यू संदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

मनपा प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मनपा आयुक्त, झोन सभापती व मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत आढावा घेण्यात येत आहे. गुरूवारी (ता.२९) सतरंजीपूरा झोन येथे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी उपाययोजनेचा आढावा घेतला. आयुक्तांनी जास्तीत – जास्त नागरिकांच्या घराचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

लक्ष्मीनगर झोनमध्ये आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, झोन सभापती पल्लवी शामकुळे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी झोनमधील नगरसेवक, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहायक आयुक्त गणेश राठोड, झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. याशिवाय नेहरूनगर झोनमध्ये विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, झोन सभापती स्नेहल बिहारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याद्वारे आढावा घेण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त हरीश राउत, हिवताप व हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे यांच्यासह झोनच्या वैद्यकीय अधिका-यांद्वारे माहिती देण्यात आली. लकडगंज झोनमध्ये झोनसभापती मनीषा अतकरे यांनी सहायक आयुक्त साधना पाटील यांच्यासमवेत डेंग्यू रुग्ण आढळलेल्या परिसराला भेट देउन पाहणी केली व उपाययोजनांचा आढावा घेतला.

बुधवारी (ता.२८) प्राप्त झोननिहाय अहवालानुसार शहरात ७९७९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात ४१६ घरे ही दुषित आढळली. म्हणजे, या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. सर्वेक्षणामध्ये १०३ ताप असलेले रुग्ण आढळून आले. तर २५० जणांच्या रक्ताचे नमूने तर १३ जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान ३०२९ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ३८१ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे २९४ कुलर्स रिकामी करण्यात आले तर ९७७ कुलर्समध्ये १ टक्के तर १५५२ कुलर्समध्ये २ टक्के टेमिफॉस सोल्यूशन टाकण्यात आले. २०६ कुलर्समध्ये गप्पी मासे सुद्धा टाकण्यात आले.

शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत: याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. पावसामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी डासांपासून संरक्षण करता येईल याची काळजी घ्यावी. सोबतच डासोत्पत्ती होणार नाही याचीही प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरातील कुंड्या, कुलरची टाकी, भांडी व जिथे पाणी साचू शकते अशा ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय ताप, उलट्या, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ ही व अशी अन्य डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.