नागपूर : गणेश विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम टाकीत बुडून एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. ही घटना शहरातील लकडगंज झोनमधील कच्ची वीसा मैदानात घडली. मृत मुलाचे नाव महेश कोमल थापा असून तो आपल्या मित्रांसोबत खेळताना पाण्यात गेला आणि बुडाला.
काही दिवसांपूर्वीच मनपाने गणेशोत्सवासाठी या मैदानात विसर्जन टाकीची उभारणी केली होती. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे टाकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पाऊस थांबल्यानंतर गुरुवारी महेश दोन मित्रांसह मैदानात गेला होता. खेळताना टाकीच्या पाण्यात बॉल गेल्याचे लक्षात येताच महेश तो बाहेर काढण्यासाठी टाकीत उतरला. मात्र, पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो थेट बुडाला.
घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच लकडगंज पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहिम राबवून काही वेळातच महेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
महेशचे वडील सुरक्षा रक्षकाचे काम करतात. महेश हा तीन भावंडांमध्ये सगळ्यात मोठा होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेनंतर नागपूर महापालिकेच्या विसर्जन टाक्यांभोवती सुरक्षा व्यवस्था का नव्हती, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांमुळे एका चिमुकल्याचा बळी गेल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.










