Published On : Sat, Aug 17th, 2019

विदर्भातील कलावंतांमधील प्रतिभा पुढे आणणारे व्यासपीठ

Advertisement

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे : ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’च्या प्राथमिक फेरीला सुरुवात

नागपूर : ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’च्या माध्यमातून चिमुकले, तरूण आणि ज्येष्ठ या सर्वांनाच आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. विदर्भातील लहान थोर गायक कलावंतांसाठी या माध्यमातून नवे दालन उघडले आहे. विदर्भातील विविध भागातील कलावंतांमध्ये दडलेली प्रतिभा पुढे आणणारे ‘व्हॉईसऑफ विदर्भ’ हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, आई कुसुम सहारे फाऊंडेशन व लकी म्यूझीकल इंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’ दुस-या पर्वाच्या प्राथमिक फेरीला शनिवार (ता.१७) सुरूवात झाली.

शनिवारी (ता.१७) व रविवारी (ता.१८) होणा-या प्राथमिक फेरीचे काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहामध्ये उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, आरोग्य समिती उपसभापती व आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे अध्यक्ष नागेश सहारे, माजी आमदार व माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते, रिचा युनिक क्लिनिकच्या डॉ. रिचा जैन, धनवटे नॅशनल काॅलेजचे प्राचार्य पी.एस. चंगोले, आशीष कोहळे, स्पर्धेचे परीक्षक सुनील वाघमारे, सीमा लोहा, महेंद्र मानके, दिलीप गोंडाणे, गिरीश शर्मा, बीसीएन न्यूजचे इम्रान शेख, नझीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले म्हणाले, ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’च्या माध्यमातून विजयी कलावंतांना राष्ट्रीय वाहिनीमधील कार्यक्रमांमधे आपली कला सादर करण्याची संधी मिळते. संपूर्ण देशात विदर्भाचे नाव यामुळे लौकीक होते ही मनपासाठी अभिमानास्पद बाब आहे. असंख्य कलावंतांच्या स्वप्नपूर्तीचे हे महत्त्वाचे व्यासपीठ असून ‘व्हॉईस ऑफ विदर्भ’ ची ही श्रृंखला पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार व माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांनी उत्तम आयोजनाबाबत आयोजकांचे अभिनंदन केले व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. विदर्भातील चिमुकले, तरूण, ज्येष्ठांना एकत्र आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एस. चंगोले, रिचा युनिक क्लिनिकच्या डॉ. रिचा जैन यांनीही यावेळी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद सलीम यांनी केले तर आभार आरोग्य समिती उपसभापती व आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे अध्यक्ष नागेश सहारे यांनी मानले.

उत्कृष्ट स्पर्धकांना मिळणार इंडियन आयडॉलमध्ये संधी

प्रास्ताविकात लकी म्युझिकल एंटरटेन्मेंटचे संचालक व स्पर्धेचे आयोजक लकी खान यांनी संपूर्ण कार्यक्रमाची भूमिका विषद केली. स्पर्धेतील १६ ते ३५ वयोगटातील उत्कृष्ट स्पर्धकांना इंडियन आयडॉल या लोकप्रिय रियॅलिटी शो च्या स्टुडिओ राउंडसाठी ‘टॉप ५०’ मध्ये संधी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विदर्भातील ३ ते १५, १६ ते ४० आणि ४१ च्या वरील वयोगटातील गायक कलावंतांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून रविवारीसुद्धा (ता.१८) स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. २५ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शंकरनगर येथील साई सभागृहामध्ये स्पर्धेची उपांत्य फेरी व ३१ ऑगस्टला रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी होईल.