नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे आता नितीन नबीन यांच्या हाती आली आहेत. दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसेच मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते.
भाजपाचे निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती देत अध्यक्षपदासाठी नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करत त्यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना जे.पी. नड्डा म्हणाले, “भाजपासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. संघटनात्मक पातळीवरून पुढे आलेल्या, तरुण आणि सक्षम नेतृत्वाच्या हाती पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवामुळे पक्षाला नवी दिशा मिळेल.”
अनुभवातून घडलेले नेतृत्व-
नितीन नबीन हे भाजपाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी लहान वयातच पाच वेळा आमदार म्हणून काम केले असून बिहार सरकारमध्ये विविध मंत्रीपदे भूषवली आहेत. राष्ट्रीय युवा मोर्चाचे महासचिव म्हणून त्यांनी देशभर संघटन मजबूत केले. तसेच सिक्कीम आणि छत्तीसगडचे प्रभारी म्हणूनही त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे.
निवडणूक प्रक्रिया अशी पार पडली-
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सोमवारी नितीन नबीन यांनी के. लक्ष्मण यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला होता. एकूण ३७ नामांकन संच सादर झाले, ते सर्व वैध ठरले. यापैकी ३६ संच विविध राज्यांमधून आले होते, तर एक संच भाजपाच्या संसदीय मंडळातील सदस्यांकडून दाखल करण्यात आला होता. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
भाजपाच्या अध्यक्षपदाचा इतिहास-
१९८० मध्ये स्थापन झालेल्या भाजपाचे नेतृत्व आजवर अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जना कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी केले आहे. आता सर्वात कमी वयाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड झाली आहे. नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप नव्या जोमाने पुढे जाईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.









