Published On : Wed, Apr 4th, 2018

विदर्भातील अतिदुर्गम भागातील अदिवासींच्या आयुष्यात महावितरणने आणली विकासाची नवी पहाट


नागपूर: राज्यातील प्रत्येक गावांचे विद्युतीकरण डिसेंबर 2018 पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दीष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणला दिले आहे. त्या अनुषंग़ाने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या प्रभावी मार्गदर्शनात 31 मार्च 2018 (शनिवार) रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या तुमिरकसा या गावाचे विद्युतीकरण पुर्ण करून विदर्भातील सर्व गावांचे विद्युतीकरणाचे उद्दीष्ट पुर्णत्वाकडे आले आहे. महावितरणच्या या सामाजिक बांधिलकीमुळे तेथील आदिवासींच्या आयुष्यात विकासाची नवी प्रकाशकिरणे झेपाऊ लागली आहेत.

विदर्भातील गडचिरोली, गोंदीया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात वनसंपदा असल्याने यांतील अनेक अतिदुर्गम भागातील गावांचे विद्युतीकरण वनविभाग आणि इतरही विविध कारणांमुळे रेंगाळले होते. मात्र ज्या गावांत पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण शक्य आहे तेथील विद्युतीकरणाची कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याच्या सुचना सर्व संबंधितांना करण्यात आल्या होत्या. तर जेथे पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण करणे अशक्य आहे त्या गावांचे ‘महाऊर्जा’ ने सौरऊर्जेच्या माध्यमातून विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महावितरणने यावर खोलवर जाऊन पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण शक्य असलेल्या सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दीष्ट 31 मार्च 2018 रोजीच पुर्ण केले आहे. आता केवळ यवतमाळ जिल्ह्यातील एक तर गडचिरोली जिल्ह्यातील 28 गावांचे विद्युतीकरण सौरऊर्जेच्या माध्यमातून महाऊर्जा ला पुर्ण करावयाचे असून या उर्वरीत गावांच्या विद्युतीकरणाचे कामही महाऊर्जाने मोठ्याप्रमाणात हाती घेतले आहे.


पारंपारिक विद्युतीकरण शक्य असलेल्या सर्वाधिक 66 गावे ही गडचिरोली जिल्ह्यातील तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील एक-एक गावे होती त्यापैकी गडचिरोली जिह्यातील 38 तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील एक-एक गावांचे विद्युतीकरण पारंपारिक पद्धतीने करणे शक्य होते. त्यापैकी नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील गावांचे शंभर टक्के विद्युतीकरण यापुर्वीच पुर्ण झाले आहे. या अनुषंगाने महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, चंद्रपूर परिमंडलचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, गडचिरोली मंडलचे अधिक्षक अभियंता अशोक मस्के यांचेसोबतच कार्यकारी अभियंते अमित परांजपे, युवराज मेश्राम आणि विजय मेश्राम यांनी सुव्यवस्थित नियोजन केले. अतिरीक्त कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. गडचिरोली आणि आलापल्ली विभागातील सर्व संबंधित अभियंत्यांनीही विद्युतीकरणाच्या या कार्यात सक्रीय सहभाग घेतला, आणि या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फ़लीत म्हणजे अवघ्या दीड वर्षात या 38 गावांचे विद्युतीकरण पुर्ण करण्यात महावितरणने यश मिळविले. या कामांसाठी गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम व जिल्हाधिकारी यांनीही शासकीय योजनांच्या माध्यमातून महावितरणला निधी उपलब्ध करून दिला असून उर्वरीत 28 गावांच्या विद्युतीकरणाचे काम महाऊर्जा ने सौरऊर्जेच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरु केले आहे.


कधीही विद्युतीकरण न झालेल्या 38 गावांचे विद्युतीकरणासोबतच महावितरणने गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 115 गावांच्या पुनर्विद्युतीकरणाचे कामही यशस्वीरित्या पुर्ण केले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात वादळवा-यामुळे वीजखांब आणि वाहिन्या कोसळून 201 गावे अनेक वर्ष अंधारात होती त्यापैकी 115 गावांचे महावितरणने पुनर्विद्युतीकरण करीत या गावांना प्रकाशित केले असून उर्वरीत 65 गावाचे पुनर्विदयुतिकरण 30 जून 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच 44 गावांचे पुनर्विद्युतीकरण हे पारंपारिक पद्धतीने महावितरण तर उर्वरीत 21 अतिदुर्गम गावात सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज पोहोचणार आहे.

विदर्भातील अतिदुर्गम असलेल्या सर्व गावांचे विद्युतीकरण करीत तेथील आदिवासींच्या आयुष्यात विकासाची नवीन पहाट आणणा-या महावितरणने त्यांच्या स्वप्नांना नवीन भरारी घेण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.