
नागपूर :एका बाजूला शहरातील मुलांच्या हातात लॅपटॉप, स्मार्ट क्लास आणि इंटरनेटची दुनिया… तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील मुलांकडे अजूनही बंद ग्रंथालये, अपुरी पुस्तके आणि संधींचा अभाव. वर्षानुवर्षे वाढत गेलेल्या या शैक्षणिक दरीवर आता नागपूर जिल्हा परिषदेकडून मोठा प्रहार करण्यात आला आहे. “प्रोजेक्ट D.R.E.A.M.” या अभिनव उपक्रमातून गावागावात ज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या आशेची पहाट उगवत आहे.
“Dedicated Rooms for Empowerment, Awareness and Motivation” अर्थात D.R.E.A.M. हा फक्त ग्रंथालय प्रकल्प नाही, तर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारी चळवळ ठरत आहे.
AI च्या युगात गाव मागे राहू नये म्हणून पुढाकार
जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी ग्रामीण भागातील वास्तव जवळून पाहिले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत असताना गावातील विद्यार्थी मात्र मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. आणि याच जाणिवेतून जन्म झाला D.R.E.A.M. प्रकल्पाचा.
गावात पहिल्यांदाच स्मार्ट शिक्षणाचा अनुभव
प्रत्येक D.R.E.A.M. लायब्ररीमध्ये सुमारे ५०० पुस्तके, स्मार्ट टीव्ही, संगणक, वाय-फाय आणि पॉवर बॅकअपची सुविधा देण्यात आली आहे. शहरातील मुलांसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या या सुविधा आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळत आहेत.
या लायब्ररींमध्ये फक्त पुस्तकेच नाहीत, तर संपूर्ण गावासाठी ज्ञानाचे खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षा ते डिजिटल साक्षरता; गाव बनतंय ‘स्मार्ट’-
दर आठवड्याला येथे विविध उपक्रम राबवले जातात.
MPSC-UPSC तयारी गट, डिजिटल साक्षरता अभियान, आरोग्य व शेती चर्चा, तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन, गावांमधील स्मार्ट स्पर्धा अशा अनेक उपक्रमांमुळे लायब्ररी आता गावाच्या विकासकेंद्रात रूपांतरित होत आहेत.
विशेष म्हणजे विद्यार्थीच आता ज्येष्ठ नागरिकांना संगणक वापर शिकवत आहेत. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञानाचा सेतू उभा राहत आहे.
ग्रामस्थांनीच स्वीकारली जबाबदारी-
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “ग्राम पुस्तकालय समिती.” गावकरी स्वतः बैठका घेतात, नियोजन करतात आणि लायब्ररीच्या कामकाजावर लक्ष ठेवतात. पुस्तकांची काळजी घेणे, शांतता राखणे आणि सुविधांचा योग्य वापर करणे हे नियम गावाने स्वतः स्वीकारले आहेत.
D.R.E.A.M. फक्त लायब्ररी नाही; ती ग्रामीण भारताची नवी आशा-
पहिल्यांदाच स्क्रीनवर डिजिटल शिक्षण पाहणाऱ्या मुलांच्या डोळ्यातील चमक, नव्या संधी मिळाल्याने उत्साहित झालेले युवक आणि बदल स्वीकारणारे शिक्षक हेच या प्रकल्पाचे खरे यश ठरत आहे.
“ज्ञान कोणाचीही मक्तेदारी नाही,” हा संदेश देत नागपूर जिल्हा परिषदेकडून सुरू झालेला D.R.E.A.M. प्रकल्प आता ग्रामीण महाराष्ट्रासाठी परिवर्तनाचा नवा मॉडेल ठरत आहे.








