मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल घडली असून, आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युतीची घोषणा केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती महत्त्वाची मानली जात असून, दोन्ही पक्षांनी मिळून सामाजिक न्याय आणि विकासाचा अजेंडा पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत युतीची औपचारिक घोषणा केली. “ही कोणत्याही अटींवर आधारित युती नाही, तर समान विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या सेवेच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत,” असं स्पष्ट करत आंबेडकर यांनी शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
या वेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची, तर रिपब्लिकन सेना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची वारस आहे. दोन्ही सेनांचा मूळ हेतू – अन्यायाविरोधात लढणे – हा समान असल्यामुळे ही युती सशक्त ठरणार आहे.”
शिंदे यांनी आणखी स्पष्ट केले की, “मी मुख्यमंत्री असलो तरी काम करणं नेहमी कार्यकर्त्यासारखं केलं. संविधानामुळे मी आज या पदावर आहे. त्यामुळे समाजातील तळागाळातील माणसांना मुख्य प्रवाहात आणण्याचं माझं कर्तव्य आहे.”
आनंदराज आंबेडकर यांनी युतीचं समर्थन करताना सांगितलं, “ही युती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची सांगड आहे. आम्ही सत्तेसाठी नव्हे, तर कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी करून न्याय मिळावा म्हणून एकत्र आलो आहोत.”
ते पुढे म्हणाले, शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्त्यासारखे काम करतात. त्यांचा हा स्वभाव आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ पाहून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना हक्क मिळावा म्हणून हा निर्णय घेतला आहे.
दोन्ही नेत्यांनी या युतीला “कार्यकर्त्यांची युती” असं संबोधलं असून, जनतेला केंद्रस्थानी ठेवून आगामी निवडणुकांमध्ये एकत्रितपणे उतरायचं ठरवलं आहे. त्यांच्या मते, ही फक्त राजकीय युती नसून, महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही युती केवळ निवडणूकपूर्व गणित बदलणारी ठरणार नाही, तर आंबेडकरी समाजाशी शिंदेंच्या शिवसेनेच्या जुळणाऱ्या नात्याचा नवा अध्यायही ठरू शकतो.