नागपूर नागपूर शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या श्वानांवर नियंत्रण आणून त्यांची निगा राखण्यासाठी महानगरपालिकेतर्फे वाठोडा भागात आधुनिक सुविधा असलेले ‘श्वान निवारा केंद्र’ उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी ६ कोटी ८९ लाख ६७ हजार २८१ रुपयांच्या खर्चाला मनपाने मंजुरी दिली आहे.
नागपूर महानगरपालिकेचे सध्या वाठोडा भागात श्वान निवारा केंद्राची पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सध्याच्या केंद्रात पायाभूत सुविधांची कमतरता असल्यामुळे श्वानांची निगा राखणे आणि निवाऱ्याचे कार्य सुरळीतपणे चालविण्याकरिता मनपा आयुक्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार वाठोडा भागातील श्वान निवारा केंद्रातील सुविधांची बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवे आधुनिक श्वान निवारा केंद्र ३ एकर जागेत उभारले जाणार आहे. यात अंदाजे २०० श्वानांची निगा राखण्याची क्षमता राहणार आहे. या सुविधेत श्वान आणि पिल्लांसाठी स्वतंत्र निवारे, विलगीकरण शेड्स, श्वानांच्या स्वच्छतेसाठी यंत्रणा, आधुनिक रुग्णालय, खेळाचे क्षेत्रे, स्वयंपाकघर, स्टोअर्स आणि प्राण्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या प्रकल्पाची वास्तुशिल्प रचना श्रीपाद दुबे यांनी केली आहे. तर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून अॅक्सीनो कॅपिटल सर्विसेस व श्रीपाद दुबे आर्किटेक्स या कंपन्यांची निवड केली आहे. या उपक्रमाद्वारे महानगरपालिकेतर्फे रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांसाठी चांगले जीवनमान आणि प्राण्यांच्या कल्याणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या प्रकल्पाला मनपाने तांत्रिक मंजुरी दिली आहे.