Published On : Wed, Apr 17th, 2024

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षादलाची मोठी कारवाई, टॉप कमांडरसह 29 माओवादी चकमकीत ठार

Advertisement

रायपूर : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे.तर दुसरीकडे छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २९ माओवाद्यांना ठार केलं.

यात ३ जवान जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये बड्या नक्षली नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली. ही चकमक मोठं यश आहे. याचे श्रेय धाडसी सुरक्षादलाला जाते. बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीनागुंडा आणि कोरोनार गावाच्या मध्ये हापाटोला गावातील जंगलात ही चकमक झाली. यात २९ माओवाद्यांना ठार करण्यात आले.

सुरक्षादलाला शंकर, ललिता, राजू यांच्यासह इतर माओवादी जंगलात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सीमा सुरक्षा दल, जिल्हा रिजर्व गार्ड यांच्या संयुक्त दलाने कारवाई केली. मंगळवारी दुपारी दोन वाजता हापाटोला गावातील जंगलात माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई केली.