नागपूर – मानकापूर परिसरातील रतननगर येथे शुक्रवारी सकाळी एका कबाडी दुकानात अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुकानाच्या अगदी शेजारी एलपीजी गॅस पंप असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
रतननगरमधील ‘एजी ट्रेडिंग’ नावाच्या कबाडी दुकानात जुन्या होम अप्लायन्सेस, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य आदींची खरेदी-विक्री केली जाते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास या दुकानात अचानक आग लागली. काही क्षणातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळवले.
सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले आणि एक भीषण दुर्घटना टळली. आग जर शेजारच्या एलपीजी पंपापर्यंत पोहोचली असती, तर मोठा स्फोट होण्याची शक्यता होती, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
अग्निशमन विभागाने सांगितले की, आग लागण्याचं नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किट किंवा ज्वलनशील पदार्थामुळे आग लागली असावी. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.तपास सुरू असून घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.