मुंबई :आषाढी यात्रा आता आठवडाभरावर राहिली आहे. या पाश्र्वभुमीवर लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. शिवाय आता आषाढीनिमित्ताने पुढील काही दिवसात भाविकांच्या गर्दीत अजून मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते. यामुळे सर्व भाविकांना सर्व सोई -सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने आषाढी यात्रेच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या आरोग्यतपासणी आणि उपचारासाठी पंढरपूर मध्ये तीन ठिकाणी मेगा कॅम्प घेतले जाणार आहेत.त्यामध्ये साधारण: 17 लाख वारकऱ्यांची तपासणी होईल असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला. डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या तीनही आरोग्य शिबिराच्या उभारणीची पाहणी केली.
राज्यभरातून शेकडो किलिमीटर पायी चालत जवळपास 463 दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. या प्रत्येक दिंड्यांसोबत 108 ची ऍम्ब्युलन्स आणि सुसज्ज वैद्यकीय पथके असल्याने भाविकांना तात्काळ वैद्यकीय उपचार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रा पंढरपूरमध्ये येताना पहिल्यांदा संत ज्ञानोबा, संत तुकाराम यांच्यासह महत्त्वाच्या संतांच्या पालख्या 27 तारखेला मुक्कामाला वाखरी येथील पालखी तळावर येणार आहेत. 28 जून रोजी हे सोहळे पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. यंदा वाखरी येथील पालखी तळासमोर पहिला मोठा कॅम्प उभारला असून येथे जवळपास पाच हजार डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ हजारो वारकऱ्यांवर 27 आणि 28 हे दोन दिवस तपासणी आणि उपचार करणार आहेत.
यात्रा पंढरपुरात आल्यावर भाविकांचा निवास तळ असणाऱ्या 65 एकर समोर दुसरा मेगा कॅम्प सुरु होणार असून येथे जवळपास साडेतीन लाख वारकरी निवासासाठी असल्यानं त्यांना याचा लाभ मिळणार आहे. तिसरा तळ दर्शन रांग असणाऱ्या गोपाळपूर येथे उभारला असून येथे दर्शन रांगेतील भाविकांना तपासणी आणि उपचार करून घेता येणार असल्याची माहती सावंत यांनी दिली.