नागपूर : आज पूर्वाभाद्रपद नक्षत्रावर आलेली अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी होत असून, शहरातील गणेश भक्तांनी पहाटेपासूनच टेकडी गणेश मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असते, मात्र मंगळवारी येणारी चतुर्थी ‘अंगारकी’ म्हणून ओळखली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार ‘अंगारक’ हे मंगळ ग्रहाचे नाव असल्याने या दिवशी गणपतीबरोबर मंगळाचीही विशेष कृपा मिळते. भक्तांच्या श्रद्धेनुसार, या दिवशी व्रत-पूजा केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते, घरातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी लाभते.
म्हणतात, फक्त एका अंगारकी संकष्टीचे व्रत केले तरी संपूर्ण वर्षभरातील संकष्टी व्रताचे फळ प्राप्त होते. याच श्रद्धेने आज दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे, तर भाविकांनी सकाळपासूनच गणेश दर्शन, नैवेद्य आणि प्रार्थनेत सहभाग घेतला.