Published On : Fri, May 7th, 2021

जिल्हयात बारा कोविड नियंत्रण कक्षातून मदतीचा हात

Advertisement

– रूग्णाची स्थिती, गृहविलगीकरणातील रूग्णांना मदत, बेडची उपलब्धता आणि तक्रारींबाबत देतायत माहिती

गडचिरोली : जिल्हयात जिल्हा मुख्यालयी 1 मुख्य नियंत्रण कक्ष व इतर 11 तालुक्यात असे मिळून 12 कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व नियंत्रण कक्षातून दैनंदिन स्वरूपात रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या प्रकारे मदत मिळत आहे. सद्या कोविड संसर्गामूळे सर्व स्तरावर धावपळ सुरू आहे. अशातच रूग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळावी व गरजूला वेळेत उपचार किंवा बेड उपलब्ध व्होवेत म्हणून या नियंत्रण कक्षांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. बहूतेक नातेवाईकांना रूग्णांना भेटता येत नाही अथवा त्यांना भेटणे संसर्गामूळे शक्य नसते. अशा वेळी सदर रूग्णाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी या कोविड नियंत्रण कक्षाची चांगली मदत होत आहे. सद्या लक्षणे नसलेल्या रूग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय देणेत येत आहे. सर्व गृहविलगीकरणातील रूग्णांवर आरोग्य विभागाच्या देखरेख खाली घरी ठेवण्यात आले आहे. अशा वेळी अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत या कोविड नियंत्रण कक्षाची मदत होत आहे. अशा रूग्णांना दूरध्वनी द्वारे आवश्यक मदत दिली जाते. अथवा आपतकालीन स्थिती असल्यास दवाखान्यात हलविण्यासाठी नियोजन केले जाते.

दि. 1 मे पासून आत्तापर्यंत जिल्हा मुख्यालयातील प्रमुख कोविड नियंत्रण कक्षामध्ये 307 नागरिकांनी संपर्क केला. तसेच नियंत्रण कक्षाकडून 1595 रूग्ण किंव त्यांचे नातेवाईक यांना संपर्क करण्यात आला आहे.

बेडची उपलब्धता : एप्रिल पासून कोरोना संसर्ग जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाढला. रूग्णसंख्या वाढली तसी बेड कमी पडू लागली, प्रशासनाकडून बेडची संख्याही वाढविण्यात आली. परंतू काही वेळा ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. काही रूग्ण प्रतिक्षेत असतात. अशावेळी नेमके रूग्णाला कुठे ॲडमिट करायचे? कुठे बेड उपलब्ध आहे? याचे उत्तर या नियंत्रण कक्षाकडे मिळते. तसेच आरोग्य विभाग अंतर्गत सनियंत्रणासाठी सर्व रूग्णांची स्थिती संगणकावर अपडेट करत असतात. यातून कोणत्या रूग्णाला कोणत्या वार्डमध्ये ठेवायचे हेही या नियंत्रण कक्षाच्या अहवालावरून समोर येते. यानंतर संबंधित डॉक्टर निर्णय घेतात. यातून बेडची उपलब्धता लक्षात येते.

कोविड नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक
1. जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष, गडचिरोली – 07132 222031, 07132 222030, 07132 222035
2. धानोरा – 9359408123
3. आरमोरी – 9405202079
4. वडसा – 07137 272400
5. कुरखेडा – 07139 245199
6. चामोर्शी – 8275913107
7. कोरची – 8275932599
8. मुलचेरा – 07135 271033, 8275879981
9. अहेरी – 07133 295001
10. एटापल्ली – 07136 295210
11. भामरागड – 07134 220039
12. सिरोंचा – 07131 233129

तक्रारी बाबतही मदत : जिल्हयातील कोविड दवाखन्यांमध्ये मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत काही तक्रारी असल्यास नागरिक येणाऱ्या अडचणी दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदवू शकतात. बेड उपलब्धता, गृहविलगीकरणातील रूग्ण अशा विषयांबाबत वेगवेगळया प्रश्नांवर नागरिक या कोविड नियंत्रण कक्षाकडे संपर्क करू शकतात. संबंधित नियंत्रण कक्ष आपली तक्रार नोंदवून तिचा पाठपूरावा करून तक्रारदाराला माहिती देतात. तसेच तक्रारी सोडविण्याबाबत संबंधित यंत्रणेला यातून सूचना दिल्या जातील.

डॉ.विनोद मशाखेत्री, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी
“गृह विलगीकरणातील रूग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविणे, त्यांच्या नातेवाईकांना रूग्ण सेवेबाबतची मदत करणे, ग्रामीण भागातून रूग्णांना जिल्हयाला भरती करताना बेडची उपलब्धता तपासणे व विविध तक्रारींचे निराकरण करणे हे या कोविड नियंत्रण कक्षाचे कार्य आहे. यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे, की रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपले संपर्क क्रमांक अचूक नोंदवावेत. कारण एवढ्या मोठया धावपळीत चुकून मोबाईल क्रमांक चुकले तर संपर्क करण्यासाठी अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत या कोविड नियंत्रण कक्षातून चांगल्या प्रकारे गरजूंना मदत दिली जात आहे.”