
नागपूर– नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात पहिल्यांदाच दोन दिवसीय मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा सिनेसोहळा 13 आणि 14 डिसेंबर रोजी कविकुलगुरु कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टीम्स, गायत्री नगर येथे रंगणार आहे.
ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाला नागपूर महानगरपालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, एनएफडीसी, मुक्ता आर्ट्स, सिने मॉन्टाज, सप्तक आणि पर्सिस्टंट सिस्टीम्स यांसारख्या विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
महोत्सवाचा प्रारंभ 13 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर आणि मनपाचे आयुक्त व प्रशासक डॉ. अभिषेक चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या दिवशी घात, स्थळ, आणि वळू हे चर्चेत असलेले आणि गौरवप्राप्त चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले जातील. दुसऱ्या दिवशी एप्रिल मे 99, व्हेंटिलेटर आणि संहिता हे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक चित्रपटानंतर दिग्दर्शक आणि कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत, जे या महोत्सवाचे मोठे आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमात कस्तुरीचे दिग्दर्शक विनोद कांबळे, घातचे दिग्दर्शक छत्रपाल निनावे, अभिनेते जनार्दन कदम, स्थळचे दिग्दर्शक जयंत सोमलकर आणि एप्रिल मे 99चे दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांसारखे अनेक मान्यवर चित्रपट निर्माते आणि कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांचे अभिनंदन आणि सत्कारही केला जाईल.
13 डिसेंबर रोजी आयोजित विशेष चर्चासत्रात “मराठी सिनेमाचा प्रवास: भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य” या विषयावर शैलेंद्र बागडे, छत्रपाल निनावे, जनार्दन कदम आणि विनोद कांबळे आपले विचार मांडणार आहेत.
या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून 16 वर्षांवरील सर्व नागपूरकरांना चित्रपट आणि चर्चासत्रांचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. उदय गुप्ते आणि विलास मानेकर (सप्तक) यांनी चित्रपटप्रेमी, विशेषतः तरुणांना, मराठी चित्रपटसृष्टीचा जवळून अनुभव घेण्यासाठी या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.









