
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला आहे. काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आज सकाळी ११ वाजता शासकीय सन्मानासह त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारांना सुरुवात झाली.
या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
अजित पवार यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे. समर्थक, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक भावूक झाले असून बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. ठिकठिकाणी अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसत असून भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. विमान लँडिंगच्या वेळी हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताचे थरारक फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना थेट शेतात कोसळल्याचे त्यामध्ये दिसते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम भूमिका आणि धाडसी निर्णयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याच्या आकस्मिक निधनाने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ भरून न निघणारी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.








