Published On : Tue, Feb 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होणार;महसूल मंत्रीत बावनकुळेंची घोषणा

Advertisement

मुंबई : राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार असून, शेतकऱ्यांना दिलेला शब्द महायुती सरकार नक्की पाळेल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी असणार असून, फार्महाऊसधारक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश केला जाणार नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. कर्जावरील वाढतं व्याज आणि त्यावर चढणारं व्याज शेतकऱ्यांना नैराश्याकडे ढकलतं, मात्र अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, असंही त्यांनी सांगितलं.

Gold Rate
03 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, गरीब शेतकरी तब्बल ३०-४० वर्षे शेतात घाम गाळतो. कर्जबाजारीपणामुळे काही वेळा आत्महत्येसारखे टोकाचे विचार मनात येतात, पण कोणत्याही शेतकऱ्याला असे पाऊल उचलू देणार नाही. पुढील काळात शेतकऱ्यांना वारंवार कर्ज घ्यावं लागू नये, यासाठीही सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचं त्यांनी संकेत दिले.

बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे राज्यात लवकरच शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कर्जमाफी केवळ गरीब शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहणार असल्याने ‘गरीब शेतकरी’ ठरवण्याचे निकष काय असतील, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि कोण वगळले जातील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

दरम्यान, काँग्रेसशासित राज्यांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजना बंद करण्यात आल्याचा आरोप करत बावनकुळे यांनी भाजपशासित राज्यांमध्ये ही योजना अखंड सुरू असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत महिलांना विनातारण आणि विनाहमी पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ही सभा धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement