Published On : Wed, Jul 17th, 2019

मिशी कापल्यावरून कन्हान पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

कन्हान : – केस कर्तनालयाने न विचारता मिशी कापली अन तिच त्याचा अंगलट आली. या मिशीच्या वादावरून फ्रेंड्स जेंट्स पार्लरचे सुनिल लक्षणे यांच्यावर कन्हान पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतचे वृत्त असे दणका युवक संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते किरण ठाकुर कटींग दाढी करण्यासाठी फ्रेंडस जेंन्टस पार्लर येथे गेले होते. यावेळी सुनिल लक्षणे यांनी किरण ठाकुर यांना न विचारता त्यांची मिशी कापली. यावर आक्षेप घेतला असता ” तेरे से जो बनता वह कर ले ” अशी अरेरावीची भाषा वापरून किरण ठाकुर यांच्याशी बाचाबाची केली. विशेष म्हणजे किरण ठाकुर यांच्या मुलगा नागपूर येथील नामांकित अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेत आहे. तेथील प्रशासनाने किरण ठाकुर यांना दिलेल्या ओळखपत्रावरच त्याना विद्यालयात प्रवेश मिळतो.

मात्र आता मिशी कापल्यामुळे प्रवेश बंद झाला आहे. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असताना या प्रकारामुळे किरण ठाकुर यांना अवघडल्या सारखे वाटत असुन त्याचा जनसंपर्कावर सुध्दा परिणाम पडत आहेत. याबाबत फ्रेंड्स जेंन्टस पार्लरचे संचालक सुनिल लक्षणे यांच्या विरोधात कन्हान पोलीस स्टेशन तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता 1860 नुसार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.