नागपूर:महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ परिसरात वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी पोलिसांनी राऊत विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांच्या सूचनेवरून कुलसचिव डॉ.राजू हिवसे यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
विद्यापीठ परिसरात वीर सावरकरांचा लघुपट दाखवण्यात आला. याच्या निषेधार्थ 1 फेब्रुवारी रोजी कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने विद्यापीठ परिसरात आंदोलन केले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी वीर सावरकरांच्या पुतळ्याचे दहन केले.
राऊत व्यतिरिक्त एनएसयूआयचे आशिष मंडपे आणि अजित सिंग यांच्यावर कलम १४३, ४३५ आणि ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान कुणाल राऊत यांना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला काळे फासल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.जामीन मिळाल्याच्या एका दिवसानंतर त्यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.