Published On : Fri, Aug 5th, 2022

भेदरलेला चेहरा अन् चिंतेचे सावट

Advertisement

-ती 13 वर्षाची अन् तो 22 चा,सात महिण्यांपासून घरून बेपत्ता

नागपूर– मध्यरात्रीची वेळ गाड्यांची धडधड अन् प्रवाशांची धावपळ थांबली होती. काही प्रवासी साखर झोपेत असल्याने सर्वत्र शांतता. अशातच एक अल्पवयीन मुलगी फलाटावर एकटीच बसली होती. भेदरलेला चेहरा, सैरभर नजर आणि चिंतेचे सावट होते. ती कुठल्यातरी संकटात असावी असे पाहताचक्षणी दिसून येत होते. तिची आस्थेनी विचारपूस केली असता पोलिसही थक्क झाले. चाईल्ड लाईनच्या मदतीने तिला बाल गृहात पाठविले. नंतर समितीच्या माध्यमातून तिला स्थानिक पोलिसांच्या सुपूर्द केले.
बालाघाट जिल्ह्यातील निशा (काल्पनिक नाव)ची आर्थिक स्थिती फार काही चांगली नाही.

कुठल्यातरी कारणाहून तिने घर सोडले. 5 जानेवारी 2022 ला ती अचानक घरून बेपत्ता झाली. घरच्यांनी बराच शोध घेतला मात्र, काही ठावठिकाणा लागला नाही. स्थानिक पोलिसांकडे मिसिंगची तक्रारही नोंदविली. अल्पवयीन (13) असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.

दरम्यान ती एका ओळखीच्या 22 वर्षाचा युवकासोबत हैदराबादला गेले. त्याच्यासोबत ती रहात होती. दोघेही मजुरी करायचे आणि एकत्रच राहात होते. काही दिवसांनी तो तिला मारहाण करू लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून एक दिवस तीने त्याचे घर सोडले. एकटीच रेल्वेने निघाली आणि नागपूर रेल्वे स्थानकावर आली. पहाटेची वेळ. गाड्यांची धडधडही थांबली होती. भारवाहक आणि प्रवाशांची धावपळही थांबली होती. काही प्रवासी साखर झोपेत होते. निशा मात्र, एकटीच जागी होती. तिच्या चेहर्‍यावर चिंतेचे सावट दिसत होते. तिला पाहून गस्तीवर असलेले हेड कॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस यांनी महिला पोलिस शिपायाच्या मदतीने तिची विचारपूस केली. ठाण्यात आणून भोजन दिले. दरम्यान ही माहिती पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांना दिली. ती अल्पवयीन असल्याने काशिद यांनी चाईल्ड लाईनशी संपर्क साधायला सांगितले. सखोल चौकशी केल्यानंतर उपरोक्त धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिस शिपाई नाजनीन पठाण यांनी लगेच बालाघाट पोलिसांनी संपर्क साधला असता ती गेल्या सात महिण्यांपासून बेपत्ता असल्याचे कळले. पोलिसांनी चाईल्ड लाईनच्या मदतीने तिला बाल गृहात पाठविले. नंतर समितीच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांच्या सुपूर्द केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.