Published On : Mon, Nov 25th, 2019

पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांनी सुचविल्या संकल्पना

Advertisement

‘वॉक अँड टॉक विथ मेयर’: जपानी गार्डनमध्ये महापौर संदीप जोशी यांचा नागरिकांशी संवाद

नागपूर: वृक्षारोपन करताना प्रत्येकाने स्वत: लावलेल्या झाडांना फलक लावून त्यांचे नाव देणे, होर्डींग एजन्सींकडून नफ्यासाठी झाडांची होणारी कत्तल, कच-याचे योग्य व्यवस्थापन व्हावे तसेच नागरिकांना योग्य सवय लागावी यासाठी ई-चालान सुरू करावे, अशा अनेक नवसंकल्पना जपानी गार्डनमध्ये नागरिकांनी सुचविल्या.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत सोमवारी (ता.२५) महापौर संदीप जोशी यांनी सेमिनरी हिल्स येथील जपानी गार्डन येथे नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेविका शिल्पा धोटे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, भाजपचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, लाफ्टर क्लबचे किशोर ठुठेजा, पोस्टल सर्वीसचे विदर्भ संचालक पवनकुमार दालमिया, मितेश रांभिया आदी उपस्थित होते.

यावेळी परिसरातील रहिवासी ॲड.ललीत मजेठिया यांनी रस्त्यावरील कच-याची समस्या मांडली. कच-यासंदर्भात जनजागृती आवश्यक असून प्रत्येक भागामध्ये मनपाने लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी मांडली. देवेंद्र माने यांनी सर्व्हीस लाईन आणि ड्रेनेज लाईन जोडल्याने पावसाळ्यात ड्रेन ब्लॉक होते त्यामुळे अशा अधिका-यांवरच कारवाई करण्याचे सुचविले. कमलेश शर्मा यांनी कच-याच्या समस्येसाठी टोल-फ्री क्रमांकाची मागणी केली. मनपातर्फे ही सुविधा सुरू असल्याचे यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. दोन्ही एजन्सींचे टोल-फ्री क्रमांक यावेळी नागरिकांना देण्यात आले.

जाहिरात एजन्सीकडून होर्डींगसाठी झाडे कापली जातात किंवा अडथळा निर्माण करणा-या झाडांच्या फाद्यांवर केमिकल टाकले जाते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अशा जाहिरात एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी केली. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी रोडच्या बाजूला आधी नाल्या करण्यात आल्या होत्या. मात्र या नाल्यांकडे दुर्लक्ष असून त्या पूर्ण बुजल्या आहेत. या नाल्या साफ केल्यास पावसाळ्यात रोडवर पाणी जमा राहणार नाही, अशी सूचना उमेश मेहतो यांनी मांडली.

मनपातर्फे पाणीपुरवठा केला जात असताना पाण्याची धार अत्यंत कमी असते त्यामुळे पाण्याची वेळ कमी करून प्रवाह वाढविल्यास सर्वांनाच सोयीचे होईल, असे व्ही.डी. शेंडे यांनी सुचविले. राजेंद्रसिंग भंगु यांनी पर्यावरणासंदर्भात महत्वाचे मुद्दे मांडले. मनपा आणि इतर विभागांमार्फत झाडे लावली जातात मात्र त्यांच कोणत्याही प्रकारे काळजी घेतली जात नाही. वृक्षारोपनामध्ये नागरिकांचा सहभाग घेउन त्यांनी लावलेल्या झाडाला नावाचे फलक लावल्यास अधिक झाडे वाचतील आणि जगविले जातील, अशी संकल्पना मांडली. जतींदरपाल सिंग यांनीही उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी मनपातर्फे काही योजना आखण्याची मागणी केली. यालाच जोड देत उम्मेसलमा मलीक यांनी शिक्षण प्रणालीमध्ये पर्यावरण हा विषय ऐच्छिक न ठेवता तो सर्वांना आवश्यक म्हणूनच ठेवण्यात यावा, असे मत मांडले.

काटोल रोडवरील डाक आणि बीएसएनएल विभागाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये कचरा आणि पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त असल्याची समस्या धनंजय राउत यांनी मांडली. आपले शहर स्वच्छ व सुंदर असावे यासाठी मनपातर्फे सेवा प्रदान केली जाते मात्र प्रत्येकाने पुढाकार घेउन आपल्या घरातील ओला व सुका कचरा जबाबदारीने विलग करूनच दिल्यास ब-यास समस्या सुटतील असे मत पोस्टल सर्वीसचे विदर्भ संचालक पवनकुमार दालमिया यांनी मांडले. मोकाट तसेच घरातील पाळीव कुत्र्यांकडून रस्त्यावर घाण केली जाते त्याचा नागरिकांना त्रास होतो त्यामुळे यावर आवश्यक कारवाई करण्याची मागणी राजीव जैन यांनी केली. याशिवाय किशोर ठुठेजा, लक्ष्मी सैगल, श्री.गवई, कल्पना कुडलिंगवार, कल्याणी बागडे, योगेश बारी, डॉ.सुनीता लवंगे आदींनीही समस्या व सूचना मांडल्या.

…तर महापौरही देणार धरणे
जपानी गार्डनमध्ये सकाळी फिरायला येणा-या नागरिकांकडून वन विभागाकडून शुल्क घेतले जाते. रोज सकाळी फिरायला येणा-या नागरिकांकडून शुल्क घेण्यात येउ नये, कल्पना कुडलिंगवार यांच्या या मागणीला उपस्थित सर्वांनीच प्रतिसाद दर्शविला. जपानी गार्डन वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने शहराचा महापौर म्हणून नागरिकांसह वन विभागाच्या संबंधित अधिका-यांना भेटून शुल्क न घेण्याची मागणी करण्यात येईल. येत्या १० दिवसांमध्ये शुल्क रद्द न केल्यास नागरिकांसह आपणही धरणे आंदोलनात सहभागी होउ, असे महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांच्या समस्यांना उत्तर देताना महापौर म्हणाले, अतिक्रमणाच्या समस्येबाबत मनपा कठोर पावले उचलत आहे. स्वच्छतेबाबही लवकरच उत्तम निकाल दिसून येईल.मात्र यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून नागरिकांनी सजग राहुन आपली जबाबदारी ओळखावी. घरातून ओला आणि सुका कचरा विलग करुन न दिल्यास तो मनपा स्वीकारणार नाही, असेही महापौर संदीप जोशी यावेळी स्पष्ट केले. कचरा, थुंकणे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालणे, वाहने चालविणे या सर्व मानवी सवयी आपल्या मानसिकतेशी जुळल्या आहेत. त्यामुळे आपण सर्व मिळून मानसिकता बदलविण्याचे स्वत:पासून सुरूवात केल्यास त्याचा आपल्यालाच फायदा होईल. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी मनपाचे उपद्रव शोध पथक तैनात आहे, मात्र नागरिकांनी स्वत:ला शिस्त लावणेही तेवढेच आवश्यक आहे, असेही महापौर संदीप जोशी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement