नागपूर – सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०२० चे पुरस्कार छबन अंजनकर, लता राजपूत, नरेंद्र पाटील, प्रमोद काळबांडे, डॉ. प्रमोद पोतदार यांना जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १ जानेवारी रोजी नागपूर येथे मान्यवरांना अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
दिव्यागांसाठी कार्य करणारे नागपूरचे छबन अंजनकर यांना डॉ. गोविंद समर्थ दिव्यांग सेवा कार्य पुरस्कार, महिलांच्या सबलीकरणासाठी काम करणाऱ्या देऊळगाव राजा येथील लताताई राजपूत यांना स्वातंत्र संग्राम सेनानी मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार, शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे नंदूरबारचे शिक्षक नरेंद्र पाटील यांना राष्ट्रपती पदक विजेते ना. बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार, पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणारे भटक्या विमुक्तांचे अभ्यासक नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वामनराव काळबांडे यांना सी.मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार आणि आरोग्यसेवेत उत्तम कामगिरी बजावणारे वरुडचे डॉ. प्रमोद पोतदार यांना डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी दहा हजार रुपये, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.
नवीन वर्षाची सुरुवात ही समाजातील विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कार्यांचा गौरव करून व्हावी व समाजानेही ती प्रेरणा घ्यावी या उद्देशाने सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे २०१६ पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त नारायण समर्थ यांनी दिली.
पुरस्कार निवड समितीमध्ये अॅड. मा. म. गडकरी, नारायण समर्थ, प्रशांत सपाटे, अनिल आदमने, अभय लांजेवार, बळवंत मोरघडे, शिवराज देशमुख आणि संस्थेच्या सचिव भारती झाडे यांचा समावेश होता.












