पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिकांना पंजीबद्ध स्थायी पट्ट्यांचे वितरण

नागपूर : राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळावा. प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासन सतत प्रयत्नरत असते. सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमितांना पंजीबद्ध स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी शासनाने आदेश जारी केला. त्यानुसार प्रत्येक अतिक्रमितांना पट्ट्यांचे वाटप होत आहे. झुडपी जंगलाच्या जागेवरील अतिक्रमितांनाही पट्टे मिळावी यासाठी सरकारने न्यायालयाचे दार ठोठावले. आता तोही मार्ग मोकळा झाला असून अशा अतिक्रमितांनाही पंजीबद्ध स्थायी पट्टे मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पश्चिम नागपूर मतदारसंघातील मरियम नगर, विकास नगर, विश्वास नगर, गोंडटोली, फुटाळा, मरारटोली येथील झोपडपट्टीवासीयांना पंजीबद्ध स्थायी पट्ट्यांचे वितरण बुधवारी (ता. ११) रविनगर चौकातील अग्रसेन भवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपातील सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, माजी महापौर तथा नगरसेविका माया इवनाते, नगरसेविका प्रगती पाटील, रूपा राय, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक संजय बंगाले, प्रमोद कौरती, सुनील हिरणवार, निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासकीय योजना ह्या लोकांसाठी असतात. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यायचा असतो. मात्र अनेकांना या योजनांची माहिती मिळत नाही. यासाठी नगरसेवक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सतत नागरिकांना त्याची माहिती करवून देतात आणि नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करतात. पंजीबद्ध स्थायी पट्टे मिळण्यासाठी आमदार सुधाकर कोहळे आणि पश्चिम नागपूरमधील सर्व नगरसेवकांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याची फलश्रुती झाली आहे. यापुढेही नागरिकांच्या सेवेसाठी सरकार सदैव तत्पर राहील, असेही ना. बावनकुळे म्हणाले.
महापौर नंदा जिचकार यांनीही नागपूर शहराच्या विकासावर प्रकाश टाकला. नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी नागपूर महानगरपालिका सदैव तत्पर आहे. नागरिकांनीही शहराच्या विकासात सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार सुधाकर देशमुख म्हणाले, पश्चिम नागपूरच्या विकासासाठी आपण दिवसरात्र झटलो. आज पश्चिम नागपूर मतदारसंघात चांगले रस्ते झाले. सोयी-सुविधा झाल्या. उद्याने झाली. क्रिडांगणे झाली. आता शासकीय योजनांचा लाभही नागरिकांना मिळावा, यासाठी वेळोवेळी शिबिरे घेतली. पंजीबद्ध स्थायी पट्टे आणि त्यानंतर घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये गरीबांना मिळवून देणे, ह्याला आपले प्राधान्य होते. आज पश्चिम नागपूर मतदारसंघातील झोपडपट्टीवासीयांना पंजीबद्ध स्थायी पट्टे देताना वचनपूर्ती केल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर नागपूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबंधित परिसरातील लाभार्थ्यांना पंजीबद्ध स्थायी पट्ट्यांचे वाटप ना. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख व अन्य मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पट्टेवाटप कार्यक्रमाचे संचालन नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम यांनी केले. कार्यक्रमातील पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












