Published On : Mon, Aug 5th, 2019

अग्निशमन स्थानकाची जागा ताब्यात घेण्याबाबतचा अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत सादर करा!

Advertisement

अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांचे निर्देश

नागपूर: शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन अग्निशमन स्थानकांची आवश्यकता आहे. झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा येथे नवीन अग्निशमन स्थानक बांधण्याबाबत शहर विकास आराखड्यात जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक वर्ष लोटूनही या जागा ताब्यात घेण्याबाबत संबंधित विभागाकडून कोणतिही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने विषयासंदर्भात गांभीर्य दाखवून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत या संबंधी अहवाल सादर करावा, असे निर्देश अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी दिले.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अग्निशमन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने सोमवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांच्यासह स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, अग्निशमन समितीचे उपसभापती निशांत गांधी, सदस्य संदीप गवई, सहायक संचालक नगर रचना प्रमोद गावंडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अधिकारी बी.पी. चंदनखेडे, सहायक केंद्र अधिकारी केशव कोठे, सुनील राउत यांच्यासह मनपाच्या सर्व अग्निशमन स्थानकांचे स्थानाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे म्हणाले, नागपूर शहरात २५ अग्निशमन स्थानकांची आवश्यकता असून अद्याप केवळ आठ स्थानक कार्यरत आहेत. स्थानकांची संख्या वाढविण्यासाठी शहर विकास आराखड्यात काही ठिकाणी जागाही आरक्षित करण्यात आल्या आहेत. झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा येथे अग्निशमन स्थानकाकरिता २००१ साली शहर विकास आराखड्यात आरक्षण मंजुर करण्यात आले. मात्र एवढे वर्ष लोटूनही जागा ताब्यात घेण्याबाबत स्थावर विभागाकडून कोणतिही कार्यवाही करण्यात आली नाही, याबाबत अग्निशमन समिती सभापतींनी नाराजी दर्शविली.

शहराच्या दृष्टीने नवीन स्थानकांची निर्मिती आवश्यक असून नवीन स्थानकांसाठी आरक्षित जागा मनपाच्या ताब्यात घेण्याबाबत विशेष प्रयत्न करण्यात यावेत. याशिवाय यामध्ये येणारे अडथळे दुर करून आरक्षणाची मुदत संपण्याबाआधी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करणे व याबाबतचा अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत समितीकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी दिली.

याशिवाय बैठकीमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या त्रिमूर्ती नगर अग्निशमन स्थानकाचे उद्घाटन करण्याची तारीख निश्चीत करणे, अग्निशमन विभागातील जुने स्थानक लकडगंज, गंजीपेठ, न्यू कॉटन मार्केट व पाचपावली या स्थानकांचे पूनर्बांधकाम करणे, राठोड ले-आउट येथील अग्निशमन स्थानकाकरिता असलेली जागा ताब्यात घेणे, वाठोडा अग्निशमन स्थानकाचे बांधकाम करणे, नागपूर शहरामध्ये नवीन ११६ हॅन्ड्रटची निर्मिती करणे आदी विषयावरही चर्चा करण्यात आली.

स्थावर विभागाच्या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस
अग्निशमन समिती ही महानगरपालिकेतील संविधानिक समिती आहे. बैठकीमध्ये स्थावर विभागाशी निगडीत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. मात्र एवढ्या गंभीर विषयावर चर्चा असताना स्थावर विभागातील कोणतेही अधिकारी अथवा विभागाचे प्रतिनिधी कुणीही बैठकीला उपस्थित नव्हते. यावर अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी नाराजी दर्शवित स्थावर विभागाच्या अनुपस्थित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील बैठकीत नियमीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

Advertisement
Advertisement