Published On : Tue, Jul 30th, 2019

आशा स्वयंसेविकांच्या नियुक्तीबाबत स्थानिक नगरसेवकांना माहिती द्या!

Advertisement

महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांचे निर्देश

नागपूर: शहरातील बालके, माता यांच्या आरोग्यासंबंधीचे प्रश्न सोडविण्यासाठी मनपाच्या वतीने दर अडीच ते तीन हजार घरांमागे एका आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात येते. मात्र याबाबत स्थानिक नगरसेवकांना कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने नागरिकांच्या समस्यांबाबत कार्यवाही करताना अडचण निर्माण होते. त्यामुळे नवीन आशा स्वयंसेवकांची नियुक्ती करताना स्थानिक नगरसेवकांना माहिती देण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विविध विषयांवर चर्चा करण्याच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात महिला व बालकल्याण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे यांच्यासह उपसभापती दिव्या धुरडे, सदस्या मंगला खेकरे, मनिषा अतकरे, विशाखा मोहोड, आसी नगर झोनच्या सभापती विरंका भिवगडे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, डॉ. पूर्वाली काटकर, शाळा निरीक्षक धनराज दाभेकर आदी उपस्थित होते.

शहरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील गरोदर महिला, नवजात बालके, माता यांच्या आरोग्याबाबत घरपोच सेवा प्रदान करणे तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना योग्य सुविधा प्रदान करता यावी यासाठी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली जाते. मात्र संबंधित आशा स्वयंसेविकांबाबत माहिती नसल्याने आवश्यक वेळी नागरिकांच्या तक्रारींवर नगरसेवकांना कार्यवाही करण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे संबंधित प्रभागातील आशा स्वयंसेविकांची माहिती स्थानिक नगरसेवक व नगरसेविकांना असणे आवश्यक आहे. यासाठी नव्याने नियुक्ती होणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या माहितीसह आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या बैठकीत स्थानिक नगरसेवक व नगरसेविकांना आमंत्रित करून त्यांची माहिती देण्याचेही निर्देश महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिले.

बैठकीत आशा स्वयंसेविकांच्या नियुक्तीसह रिसायकलींग सेंटरला परवानगी, पाळणाघरांची योजना आदी विषयावर चर्चा करण्यात आली. शहरात सद्या पाच ठिकाणी ‘रिसायकलींग सेंटर’ तयार करण्यात आले आहेत. ‘रियाकलींग सेंटर’मार्फत महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचा उद्देश आहे. यासाठी सर्व झोनमध्ये केंद्राच्या निर्मितीसाठी सभागृहामध्ये विषय पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी प्रशासनामार्फत देण्यात आली. याशिवाय महिला नगरसेविकांना वाहन प्रशिक्षण, सर्व झोनमध्ये ‘पोटोबा’ सुरू करणे अशा विविध विषयांचा महिला व बालकल्याण समिती सभापतींनी आढावा घेतला.

Advertisement
Advertisement
Advertisement