Published On : Tue, Jul 30th, 2019

मनपातील अतिरिक्त शिक्षकांची यादी शासनाकडे पाठविणार

Advertisement

शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांची माहिती : शाळांच्या ‘डिजीटलायझेशन’वर भर

नागपूर : मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता सध्या असलेले काही शिक्षक अतिरिक्त आहेत. ज्या शाळांत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक अतिरिक्त असतील अशा शिक्षकांची यादी तातडीने तयार करण्याचे निर्देश मनपाच्या शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शिक्षण विभागाला दिले. शासनाने मागणी केल्यानुसार अशा अतिरिक्त शिक्षकांची यादी शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात मंगळवारी (ता. ३०) शिक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्यासह उपसभापती प्रमोद तभाने, सदस्य सुषमा चौधरी, प्रमिला मंथरानी, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर, सहायक कार्यक्रम अधिकारी दिनेश चौलीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, विनय बगळे, शालेय पोषण आहार अधिकारी गौतम गेडाम उपस्थित होते.

नुकत्याच आटोपलेल्या झोननिहाय मुख्याध्यापक सभेचा आढावा घेताना सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शाळांमधील सोयी-सुविधांबाबत मुख्याध्यापकांनी वेळोवेळी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्वच्छता, विद्युत आणि पाणी यासंदर्भात झोनस्तरावर सहायक आयुक्तांना पत्र द्यावे. शाळांची रंगरंगोटी, स्वच्छतागृहे याबाबत तातडीने आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

मुख्याध्यापकांच्या बैठकीतून आलेल्या समस्या आणि सोयी सुविधांबाबत लवकरच आयुक्तांसोबत चर्चा करण्यात येईल व निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ठरल्यानुसार शाळांमध्ये सुधारणा झाली नाही तर त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवरच निश्चित करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. ‘असर’च्या सर्वेक्षणात ज्या शाळांचा निकाल ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या शाळांतील शिक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचे निर्देशही सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.

शाळा निरिक्षकांनी प्रत्येक आठवड्याचा निरिक्षणाचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी सभापतींनी विविध विषयांचा आढावा घेतला. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुख्याध्यापक व शिक्षकांनी केलेले प्रयत्न, शालेय गणवेश वाटप, शालेय पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना देण्याबाबत केलेल्या कार्याचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ‘वंदे मातरम्‌’ गायन स्पर्धेत शहरातील प्रत्येक शाळांना पत्र पाठविण्याचे निर्देश सभापतींनी यावेळी दिले. शिक्षण विभागांतर्गत शालेय शैक्षणिक साहित्य खरेदी, इमारत बांधकाम, किरकोळ दुरुस्ती, शाळेत वापरात येणाऱ्या वस्तू व इतर खरेदी परस्पर न करता प्रथम समितीत विषय घेऊन मंजूर करण्याचे निर्देशही यावेळी सभापतींनी दिले.

पोषण आहाराच्या स्वयंपाकघराची करणार पाहणी
शालेय पोषण आहारासंदर्भात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ज्या संस्थांकडे कंत्राट दिले त्या संस्थांच्या स्वयंपाकघराची पाहणी शिक्षण समितीचे सदस्य अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत करतील, अशी माहिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली. शासनाच्या मानकानुसार स्वयंपाकघर आहे, अथवा नाही, यासंदर्भात समिती पाहणी करेल. यावेळी पोषण आहार पुरवठ्यासंदर्भातील माहिती शालेय पोषण आहार अधिकारी गौतम गेडाम यांनी दिली.

‘डिजीटलायझेशन’वर भर
नागपूर महानगरपालिकेच्या सुमारे १४४ शिक्षकांना मागील वर्षी डिजीटल प्रशिक्षण देण्यात आले होते. आता मनपाच्या प्रत्येक शाळांमध्ये एक ‘डिजीटल वर्ग’ असावा, यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले. निधीच्या उपलब्धतेप्रमाणे किमान १०० शाळा पहिल्या टप्प्यात डिजीटल करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. डिजीटल वर्गामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांचा अहवालही सभापतींनी मागविला.

Advertisement
Advertisement
Advertisement