Published On : Mon, Jul 29th, 2019

कामगारांची नोंदणी वाढवून योजनांचे लाभ पोहचविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

इमारत व इतर बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेतील लाभाचे वाटप

नागपूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगार नोंदणीत मागील पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली असून आगामी काळातही अधिक नोंदणी करुन या कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ कामगारांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत गायत्रीनगर येथील प्रादेशिक कामगार प्रशिक्षण संस्था येथे विविध कल्याणकारी योजनेचा लाभ वाटप सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, सचिव श्री. चु. श्रीरंगम व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार हे खऱ्या अर्थाने विश्वकर्मा आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मागील पाच वर्षातील काम अतिशय कौतुकास्पद असून कामगार नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे. 15 लाख कामगारांची नोंदणी मागील पाच वर्षात करण्यात आली असून आगामी काळात ही नोंदणी संख्या 25 लाखापर्यंत करण्यात येईल. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सुविधा, कामगारांना टूल किट, तसेच कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठीही मदत देण्यात येते. या मदतीचा लाभ घेवून कामगारांची मुले परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. ही बाब निश्चितच उल्लेखनिय आणि अभिमानास्पद आहे. बांधकाम कामगारांना आता खऱ्या अर्थाने लाभ मिळत असून हे लाभ पोहचविण्यासाठी शासन कामगारांपर्यंत पोहचत आहेत. बांधकाम कामगारांना घरासाठी अटल आवास योजनेअंतर्गत साडेचार लाख रुपये उपलबध्द करुन देण्यात येत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव म्हणाले, मागील पाच वर्षात मंडळाचे कामकाज अतिशय वेगात सुरु असून कामगार नोंदणीची संख्या आता 17 लाखापर्यंत पोहचली आहे. 8 हजार कामगारांना विविध योजनाअंतर्गत 19 कोटी रुपयाचे वाटप संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री. यादव यांनी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री. चु. श्रीरंगम म्हणाले, कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी विविध प्रकारच्या 29 योजना राबविण्यात येतात. कामगारांसाठी आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात येते असल्याचे श्रीरंगम यांनी सांगितले.

यावेळी इमारत व इतर बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेतील लाभाचे वाटप करण्यात आले.