Published On : Wed, Jun 19th, 2019

‘स्वयम्’तर्फे २१ जूनला निःशुल्क करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

Advertisement

दहावी/बारावीनंतरचे अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांतील संधींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
विद्यार्थी-पालकांना मिळणार विविध करिअर पर्यायांची माहिती

नागपूर : दहावी/बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आवड आणि क्षमतेचा विचार न करता सहसा ठरावीक अभ्यासक्रमांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरची दिशा ठरविताना त्यांचा गोंधळ उडतो.

ही समस्या टाळण्यासाठी आणि दहावी/बारावीनंतरच्या महत्त्वपूर्ण वळणावर विद्यार्थी-पालकांना विविध करिअर पर्यायांची माहिती करून देण्याच्या उद्देशाने स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबच्या वतीने निःशुल्क करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मानेवाडा रोडवरील सिद्धेश्वर सभागृहात शुक्रवारी (ता. २१ जून) सायंकाळी ६ वाजता घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेत सायकॉलॉजिस्ट व करिअर कौन्सिलर डॉ. नितीन विघ्ने हे दहावी, बारावी आणि पदवीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देतील, तर स्पर्धा परीक्षांतील संधींबाबत पुणे येथील द युनिक अ‍ॅकेडमीचे संदीप सिंग हे मार्गदर्शन करतील.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पहिल्या सत्रात – दहावी/बारावीनंतर कोणत्या निकषांच्या आधारावर फॅकल्टी (विद्याशाखा) निवडायची, नावीन्यपूर्ण व रोजगारसंधी असणारे अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी व त्यानंतर उपलब्ध असणारे करिअर पर्याय आदींबाबत डॉ. विघ्ने मार्गदर्शन करतील. तसेच ते विद्यार्थी-पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. दुसऱ्या सत्रात – यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन व इतर स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपाबाबत संदीप सिंग हे मार्गदर्शन करतील.

दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षांची कशी तयारी करायची, अभ्यासाचे नियोजन आदींबाबतही ते माहिती देतील. त्यानंतर विद्यार्थी-पालकांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षांबाबत असलेल्या समज-गैरसमजाबाबत अवगत करतील. कार्यशाळेस्थळी स्पर्धा परीक्षांची पुस्तके ५० टक्के सवलतीत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील.

दहावी आणि बारावीनंतर कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी अचूक मार्गदर्शन आवश्यक असल्याने ही कार्यशाळा विद्यार्थी आणि पालकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या निःशुल्क करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ७७२००४४२४४ किंवा ८६०५१७९१४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement
Advertisement