Published On : Wed, Jan 9th, 2019

दुष्काळी मदतीबाबत पंतप्रधानांकडून अवाक्षरही का नाही?: विखे पाटील

Vikhe Patil

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूरच्या भाषणात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अवाक्षरही न काढल्याचा आणि उलटपक्षी सरकारच्या लोकविरोधी कारभाराच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून झालेल्या बेदम मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मागील तीन महिन्यात पंतप्रधान दोन वेळा महाराष्ट्रात आले. पण एकदाही त्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज भासली नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्घाटनांसाठी नरेंद्र मोदींकडे वेळ आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सवड का नाही, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसेल तर किमान महाराष्ट्रात आल्यानंतर येथील दुष्काळ निवारणासाठी भऱीव आर्थिक मदत करण्याची घोषणा तरी त्यांनी करायला हवी होती. मात्र पंतप्रधानांनी साधी घोषणा करण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस पंतप्रधानांकडे दुष्काळी मदतीसाठी साकडे घातले. त्यापश्चातही नरेंद्र मोदींनी दुष्काळी मदतीबाबत मौन बाळगावे, हे संतापजनक आणि शेतकऱ्यांप्रती भाजप सरकारच्या संवेदना मेल्याचे निदर्शक असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

‘त्या’ पोलिसांना तातडीने निलंबित करा!
भाजप सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर निदर्शने करणाऱ्या युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानवी पद्धतीने मारहाण करण्याच्या घटनेचाही विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. एक तर लोकहिताचे निर्णय घ्यायचे नाही आणि त्याविरूद्ध कोणालाही बोलूही द्यायचे नाही, असा या सरकारचा हुकूमशाही कारभार सुरू असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

पंतप्रधानांच्या दौऱ्यात निदर्शने केली म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असते तर समजू शकलो असतो. पण त्यांना अमानुष पद्धतीने लाथांनी तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करणाऱ्या पोलिसांना तातडीने निलंबित केले नाही तर स्वतः सोलापुरात जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement