Published On : Wed, Jul 4th, 2018

विदर्भाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणार : शिवसेना

Advertisement

shivasena-logo

नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच भाजपा ला शिवसेनेचा सामना करावा लागला. यावेळी इतर विरोपाधी पक्षाप्रमाणे शिवसेनेने देखील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रपरिषदेला अनिल परब, सुनील प्रभू, रवींद्र पाठक आदी उपस्थित होते.

केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची फारच बिकट अवस्था झाली आहे. कर्जामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. तसेच, अजूनही शेतकऱ्यांना बोन्ड अळीची नुकसानभरपाई मिळालेली नाही . त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे, यासंदर्भात शिवसेनेचे आमदार दोन्ही सदनातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहे. या दरम्यान,राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी . तसेच, शेतमालाला योग्य भाव मिळावा. अशी मागणी देखील यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

नागपूरसह राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. अफवांच्या माध्यमातून मोठ्या घटना घडत आहे. गुन्हेगारांना गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात राजाश्रय मिळत आहे, हे मुद्दे शिवसेना प्रकर्षाने मांडणार आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, संभाजीनगरातील दंगल संदर्भात आवाज उचलण्यात येणार आहे. बँकेतून पळ काढलेल्या कर्जबुडव्यासंदर्भात शिवसेना आक्रमक आहे.तसेच, यावेळी शिवसेनेने नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विरोध केला आहे. भाजप सरकार नाणारसाठी कितीही प्रयत्न करत असेल तर आम्ही नाणार होऊ देणार नाही, अशी भुमीका पुन्हा एकदा शिवसेनेने स्पष्ट केली आहे.

यावेळी सुनील प्रभू म्हणाले,मुंबई विमानतळाच्या देखरेखीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. तसेच, राज्य सरकारने मुंबईचं गृहनिर्माण धोरण तात्काळ घोषित करावे. यादरम्यान, ग्रामीण भागातल्या आमदारांना योजना आणि आमदार निधी व्यतिरिक्त अधिक निधी मिळावा यासाठी आज शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्याना भेटले असल्याची माहिती देखील यावेळी सुनील प्रभू यांनी दिली

पुढे अनिल परब म्हणाले, राज्य सरकारने मुंबईचे हाल केले आहे. मुंबईकर आज आपला जीव मुठीत घेऊन जगात आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार गंभीर नाही आहे. त्यामुळे यंदा अधिवेशनात आम्ही जे विषय मांडू ,त्यावर सरकारला ठोस भूमिका घ्यायला देखील आम्ही भाग पडणार, असेही अनिल परब म्हणले.