नागपूर: कुटुंबासह प्रवास करीत असताना प्रवाशांच्या गर्दीत एखादा चिमुकला दिसेनासा झाला तर असे प्रकार रेल्वेत घडतात. परंतु जिवाचा तुकडा दिसला नाही तर त्या पालकांची काय स्थिती होत असेल कल्पना करा… असाच काहीसा प्रकार सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. मात्र, आरपीएफच्या प्रयत्नाने त्या ३ वर्षाच्या चिमुकल्यास त्याचे आई-वडील मिळाले. काळजाच्या तुक ड्याला पाहताच क्षणी पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते.
रेल्वे प्रवासाचा आनंद काही वेगळाच आहे. बच्चे कंपनीला तर रेल्वे प्रवास आवडतोच. रेल्वेच्या वेगळ्या जगात गाड्यांचे संचालन आणि प्रवाशांची धावपळ नेहमीच असते. त्यामुळे बोट धरुन चालतानाही गर्दीत मुलगा हरवल्या जातो. जाटव कुटुंब १२६१६ जीटी एक्स्प्रेसच्या एस-८ कोचमधून मथुरा ते चेन्नई असा प्रवास करीत होते. सोमवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर जीटी आली. दरम्यान चिमुकला खेळता खेळता फलाटावर आला दरम्यान गाडी सुरू झाली आणि निघालीही. तिकडे मुलगा दिसत नाही म्हणून पालक डब्यातच त्याचा शोध घेत होते.
दरम्यान आरपीएफ उपनिरीक्षक आ.पी. त्रिपाठी, अमोल चहाजगुने, बी.एस. यादव गस्तीवर असताना त्यांना एक चिमुकला एकटाच दिसला. त्याची विचारपूस केली असता तो रडायला लागला. त्यामुळे त्याला आरपीएफ ठाण्यात आणले. कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक होतीलाल मीणा यांनी या घटनेसंबधी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनाही माहिती दिली. तसेच काही वेळापूर्वी निघालेल्या गाडीत चिमुकल्याचे पालक असावेत अशी शक्यता वर्तविण्यात आली. तशी सूचनाही गस्तीवर असलेल्यांना दिली. दरम्यान चिमुकल्याच्या वडिलांनी सेवाग्राम स्थानकावर साखळी ओढून गाडी थांबविली. याच वेळी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर अनाऊंसमेंट करण्यात आली. एक तीन वर्षाचा चिमुकला नागपूर आरपीएफ ठाण्यात सुखरुप असल्याचे शब्द पालकाच्या कानी पडताच त्यांनी तेथील कर्मचाºयांची भेट घेतली. तसेच नागपूरला परत आले. कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक विद्याधर यादव यांनी विचारपूस केली. खात्री पटल्यानंतर त्या चिमुकल्यास पालकांच्या स्वाधीन केले.