Published On : Thu, Mar 8th, 2018

सर्व भूमिकांना स्त्रियांनी न्याय दिला : महापौर

Advertisement


नागपूर: महिला ही सर्वच भूमिका यथोचितपणे पार पाडत असते. आता व्यावसायिक क्षेत्रातही महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. संस्कार घडविणारी आई, सांभाळ करणारी बहीण, नोकरी आणि उद्योग करून संसाराला हातभार लावणारी पत्नी अशा प्रत्येक भूमिकांना स्त्रियांनी न्याय दिला आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी महिलांचा गौरव केला.

जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे सिव्हील लाईन्स स्थित मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय सेवाप्रमुख आणि वाघमारे मसाले उत्पादनाच्या संचालिका श्रीमती मृणालिनी वाघमारे, डॉ. प्रतिभा अश्विन मुदगल, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, माजी सभापती व मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या दिव्या धुरडे, मनिषा अतकरे, खान नसीम बानो मो. इब्राहीम, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपअभियंता तथा राष्ट्रीय महानगरपालिका महिला कर्मचारी संघाच्या अध्यक्षा कल्पना मेश्राम, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी सुधा इरस्कर, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी सविता मेश्राम उपस्थित होत्या.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महिला आज सर्वच क्षेत्रात आपले स्थान बळकट करीत आहे. महानगरपालिकेतील नगरसेवकांमध्ये निम्मी संख्या महिलांची आहे आणि त्या सक्षमपणे आपली भूमिका बजावत आहेत. महिला महापौर या नात्याने या सर्व महिलांच्या कार्याची दखल नागपूर महानगरपालिका घेत असून नागपुरातील महिलांसाठी सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय सेवाप्रमुख मृणालिनी वाघमारे यांनी महिलांनी गृहस्थाश्रमाची जबाबदारी योग्यपणे पार पाडतानाच उद्योग क्षेत्रात कशी भरारी घेतली, याबाबत विवेचन केले. डॉ. प्रतिभा मुदगल यांनी महिला दिनाचे वास्तव परखडपणे मांडतानाच स्त्रियांसाठी प्रत्येक दिवस हा महिला दिन असतो, असे सांगितले.


महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून दिली. नागपूर महानगरपालिका प्रत्येक महिलांचा सन्मान करते. आपआपल्या क्षेत्रात कर्तृत्व बजावणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक सत्कार नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून या महिलांचा सन्मान म्हणजे संपूर्ण स्त्री जातीचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट करीत महिलांनी कुठल्याही क्षेत्रात आता मागे न राहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समोर यावे, असे आवाहन केले.

प्रारंभी देवी सरस्वती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन आनंद आंबेकर यांनी केले. उपअभियंता कल्पना मेश्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागपूर महानगरपालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
सत्कारमूर्तींमध्ये स्वातंत्र्य चळवळीतील लिलाताई चितळे, शिक्षिका उषा मिश्रा, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर,स्वरांजली वस्तीस्तर संस्थेच्या सुषमा भोवते, लेखिका आणि महाराष्ट्र पत्रकार संघाच्या विदर्भ अध्यक्ष रश्मी पदवाड-मदनकर, नवलाई शहरस्तर संस्थेच्या बेबीताई रामटेके, भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक शुभदा संख्ये, आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत ठसा उमटविणाऱ्या वंदना व्यास, जलतरणपटू हिमानी फडके यांचा समावेश होता. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेत एक वर्ष यशस्वीपणे आपल्या प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नगरसेविकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.


आरोग्य शिबिर आणि स्वच्छता मोहीम
महानगरपालिका समाजकल्याण विभागाच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमानंतर परिसरात महिलांद्वारे स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.

Advertisement
Advertisement