File Pic
नागपूर: मुंबईला जाणाऱ्या कुठल्याही गाडीत चोवीस तासांच्या आत बॉम्बस्फोट घडविणार, अशी माहिती लोहमार्ग पोलिस अजनी मुख्यालयाला मिळाली. त्यामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कामाला लागली आहे. रात्री १२ वाजेपासून बीडीडीएस आणि श्वानपथक मुंबईला जाणाºया सर्व गाड्यांची कसून तपासणी करीत आहेत. मात्र, अद्याप घातपात करणारी कुठलीही वस्तू आढळून आली नाही.
शनिवारी रात्री २१.५० वाजताच्या सुमारास अजनी मुख्यालयाला भुसावळ नियंत्रण कक्ष (आरपीएफ)कडून फोन आला. भूसावळला गोरखपूर नियंत्रण कक्षाने फोन केला. अजनी मुख्यालयाला माहिती मिळताच बीडीडिएस आणि श्वानपथक रात्री १२ वाजेपासून संपूर्ण गाड्यांची तपासणी करीत आहेत. यापूर्वी अशाच प्रकारची माहिती मुख्यालयाला मिळाली होती. तसेच नागभीड रेल्वेस्थानकावरही स्फोट घडविणार, असे पत्रही मिळाले होते. मात्र, आजपर्यंतचे फोन आणि पत्र अफवाच ठरले. संवेदनशील रेल्वेस्थानकांत नागपूर स्थानकाचा समावेश होतो. त्यामुळे येथील गाड्यांची आणि संपूर्ण स्थानकाची नियमित तपासणी केली जाते.
स्फोट घडविण्याची माहिती मिळताच मुंबईला जाणारी हटिया-पुणे, गीतांजली, शालीमार, हावडा-मुंबई मेल, गोंदिया-मुंबई विदर्भ, समरसता आणि नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसची कसून तपासणी करण्यात आली. विदर्भ एक्स्प्रेस आणि रात्री ८.५० वाजता निघालेल्या दुरंतोची तपासणी करतेवेळी प्रवाशांत कूजबूज सुरू होती. जनरल, स्लिपर आणि एसी डब्यांची तसेच बर्थ खाली तसेच शौचालयाचीही तपासणी करण्यात आली. मात्र, आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. मात्र, २४ तास तपासणी सुरू असल्याने कर्मचाºयांची चांगलीच धावपळ होत आहे.