
अमरावती : शहरात एका गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून, हिंदू नाव धारण करून युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.
तक्रारीनुसार, मुख्य आरोपी रियाजुद्दीन फैयाजुद्दीन पठाण हा पंचवटी चौक परिसरात बी.पी.एड कॉलेजजवळ चायनीज ठेला लावत होता. तो स्वतःला “राजू” या नावाने ओळख करून देत विविध अडचणीत असलेल्या युवतींशी संपर्क साधत असे. मदतीचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन करून नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे.तसेच, उपचार किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली तो युवतींना सुनसान ठिकाणी नेत असे आणि त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. काही प्रकरणांमध्ये आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेत केवळ एका युवतीचा समावेश नसून, अशाच प्रकारे आणखी अनेकांना फसवण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून तपासात समोर येत आहे. त्यामुळे हे प्रकरण मोठ्या रॅकेटशी संबंधित असू शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शहरातील अनधिकृत हॉकर्सच्या हालचालींवरही प्रश्न उपस्थित झाले असून, यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.








