नागपूर :शहरातील अमली पदार्थविरोधी मोहिमेला गती देत पाचपावली पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई करत एमडी ड्रग्ससह एका 23 वर्षीय युवकाला अटक केली आहे. विक्रीच्या उद्देशाने हे ड्रग्स बाळगल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5.50 ते 7 वाजण्याच्या सुमारास कमाल चौक, शनिवार मार्केट परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान एमएच-49-सीजी-3946 क्रमांकाच्या होंडा अॅक्टिव्हा वाहनावरून येणाऱ्या नितेश संजय हेडाऊ (वय 23, रा. म्हाडा क्वार्टर्स, कपिलनगर) याला ताब्यात घेण्यात आले.
एमडी पावडर, मोबाईल आणि वाहन जप्त
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपीकडून 10.50 ग्रॅम एमडी पावडर (किंमत अंदाजे 73,500 रुपये) जिप-लॉक पाउचमध्ये आढळून आली. याशिवाय एक मोबाईल फोन आणि दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले असून, एकूण जप्त मालाची किंमत सुमारे 1,45,500 रुपये आहे.
पुरवठादाराचा शोध सुरू-
चौकशीदरम्यान आरोपीने हे ड्रग्स कपिलनगर येथील जगदीश गोखले (वय 25) याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर पोलिसांनी मोठा आघात केला असल्याचे मानले जात आहे.








