
नागपूर– शहरात कायदा-सुव्यवस्थेला हादरा देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीदरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यावरच चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आरोपींनी पोलिसांची बुलेट मोटारसायकल लुटून घटनास्थळावरून पलायन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, PSI सचिन वाकलेकर हे आपल्या होमगार्ड सहकाऱ्यासोबत डिप्टी सिग्नल परिसरात गस्त घालत होते. यावेळी काही युवकांनी एका संशयित व्यक्तीला पकडल्याचे सांगत पोलिसांना बोलावले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करताच परिस्थिती अचानक बिघडली. आरोपीने चाकू काढत PSI वाकलेकर यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
घटनेनंतर आरोपींनी पोलिसांची बुलेट मोटारसायकल हिसकावून घेतली आणि फरार झाले. जखमी PSI यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने परिसरात शोधमोहीम राबवत CCTV फुटेजच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हे आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून ते नागपूरात मजुरीचे काम करत होते. पुढील तपास सुरू आहे.








