Published On : Fri, Mar 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पेट्रोल-डिझेल दर वाढीच्या चर्चेला उधाण; प्रीमियम इंधनाने घेतली आघाडी

Advertisement

नागपूर : राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही शहरांमध्ये इंधनाच्या किंमतीत किरकोळ बदल झाल्याचे समोर आले असून, प्रामुख्याने प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष वेधले गेले आहे.

जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यामुळे भविष्यात इंधन दर वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच महाराष्ट्रातील काही भागांत प्रत्यक्षात किंमतीत बदल दिसू लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Gold Rate
Mar 21 2026 - Time 10.22Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,200 /-
Gold 22 KT ₹ 1,35,000 /-
Silver/Kg ₹ 2,30,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रीमियम पेट्रोल महाग, नियमित दर स्थिर-
सोलापूरसह काही शहरांमध्ये साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोलापुरात पेट्रोल सुमारे १०४ रुपये प्रति लिटर दराने स्थिर आहे. मात्र प्रीमियम (स्पीड) पेट्रोलच्या दरात सुमारे २ रुपयांची वाढ होऊन तो ११३ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

पुणे शहरातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. नियमित पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असले तरी प्रीमियम इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्याचे पेट्रोल पंप चालकांनी सांगितले. सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दरवाढीच्या चर्चेमुळे काही ठिकाणी ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

गॅस दरवाढीनंतर चिंता वाढली-
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात अलीकडेच ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार का, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंधन दरातील प्रत्येक हालचालीकडे सर्वसामान्यांचे बारकाईने लक्ष लागले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून दिलासा-
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रति बॅरल ११९ डॉलरपर्यंत पोहोचलेले दर सुमारे १४ डॉलरने कमी झाले आहेत. अमेरिकन क्रूड (WTI) च्या किंमतीतही जवळपास ८ डॉलरची घट झाली आहे.

मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजाराला दिलासा मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नागरिकांना सल्ला-
सध्यातरी सामान्य पेट्रोल-डिझेल दर स्थिर असले तरी प्रीमियम इंधन महाग झाले आहे. आगामी काळात जागतिक परिस्थितीनुसार दरात बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून इंधन साठवण्याऐवजी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement