
नागपूर : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी आणखी एक कठोर निर्णय घेतला असून कुख्यात गुंड सचिन उर्फ वांग्या राकेश कुंभरे (वय २८, रा. दुर्गा चौक, बैल बाजार, जुनी कामठी) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी १८ मार्च २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
सदर आरोपीवर जुनी कामठी आणि खापरखेडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, घरफोडी, प्राणघातक शस्त्र बाळगणे तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यापूर्वीही संबंधित आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला होता, तसेच २०२५ मध्ये बीएनएसएसच्या कलमांन्वये कारवाई करून त्याच्याकडून बंधपत्रही घेण्यात आले होते. मात्र, या अटींचे उल्लंघन करत त्याने पुन्हा गुन्हेगारी मार्ग स्वीकारत चोरी व घरफोडीचे प्रकार केले.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून जुनी कामठी पोलीस ठाण्याने गुन्हे शाखेकडे स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर एमपीडीए विभागाच्या शिफारसीवरून पोलीस आयुक्तांनी आदेश देत संबंधित आरोपीला स्थानबद्ध करण्यात आले. सुरुवातीला नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्याचे निर्देश असले तरी सध्या त्याला नागपूर कारागृहात ठेवण्यात आले आहे.
या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.









