
नागपूर : जिल्ह्यात अलीकडेच घडलेल्या औद्योगिक स्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व स्फोटक व रासायनिक उद्योगांची सखोल सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणीचा उद्देश आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि औद्योगिक परिसरातील कामगारांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे.
ही तपासणी पुढील एका महिन्यात पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संघटना, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून केली जाणार आहे. या दरम्यान उद्योगांमधील सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन उपाययोजना तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजनांची तपासणी करण्यात येणार आहे.
१ मार्च रोजी एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २ मार्च रोजी आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व स्फोटक व रासायनिक उद्योगांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच उद्योगांनी अद्ययावत आपत्कालीन प्रतिसाद व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवण्याचेही आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत औद्योगिक आपत्ती व्यवस्थापनासाठीची मानक कार्यपद्धती, आवश्यक कायदेशीर सुधारणा तसेच नवीन सुरक्षा नियमांवर चर्चा करण्यात आली. तपासणीत आढळणाऱ्या त्रुटी उद्योगांनी तातडीने दुरुस्त कराव्यात आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेत उद्योगांनी कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, यासाठी कंपनीच्या अर्थसंकल्पात सुरक्षा उपायांसाठी पुरेसा निधी राखून ठेवावा, असे आवाहन केले. तसेच कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देणे आणि कार्यस्थळी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण माहिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तसेच औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. औद्योगिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी सादरीकरणही केले.








