
नागपूर : शहरात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला असून व्यावसायिक गॅस सिलिंडरची कमतरता निर्माण झाल्याने अनेक छोट्या हॉटेल, टपऱ्या व खानावळींनी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे चित्र समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण–इजरायल युद्धाचा परिणाम इंधन व गॅस पुरवठ्यावर होत असल्याचीही चर्चा असून त्याचा अप्रत्यक्ष फटका शहरातील पुरवठ्यावर पडत असल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, अलीकडे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा कमी पडू लागल्याने हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक व्यावसायिकांनी घरगुती सिलिंडर वापरणे सुरू केले आहे. मात्र नियमांनुसार व्यावसायिक वापरासाठी स्वतंत्र कमर्शियल सिलिंडर वापरणे बंधनकारक आहे.
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असलेला गॅस कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सींवर सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागत असून वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
गॅस वितरकांच्या माहितीनुसार, घरगुती गॅसचा पुरवठा मर्यादित कोट्यानुसार केला जातो. मात्र त्याच सिलिंडरचा वापर हॉटेल आणि खानावळींमध्ये होत असल्याने उपलब्धता कमी पडते. परिणामी नागरिकांना वेळेवर गॅस मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
दरम्यान, या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अचानक तपासण्या झाल्यास हा गैरप्रकार थांबू शकतो, असेही मत व्यक्त केले जात आहे.








