
मुंबई :भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा उमेदवार मायाताई ईवनाते यांनी आज मुंबईतील विधान भवन येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारले. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते.
मायाताई ईवनाते यांना राज्यसभेची उमेदवारी देत भारतीय जनता पक्षाने आदिवासी समाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या निवडीमुळे आदिवासी समाजाच्या प्रश्नांना संसदेत आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या १५ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे पक्षाने यावेळीही धक्का तंत्राचा वापर करत अनुभवी नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे.
यामध्ये मायाताई ईवनाते यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे. त्यांच्या नावाची यापूर्वी फारशी चर्चा नसताना थेट राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली.
पक्षाकडून आदिवासी समाजातील नेतृत्वाला पुढे आणण्याचा हा प्रयत्न मानला जात असून, आगामी काळात त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








