Published On : Wed, Mar 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली; पीएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे बदल केले असून नागपूर मनपाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या आयुक्तपदी करण्यात आली असून लवकरच ते नवा पदभार स्वीकारणार आहेत.

राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पीएमआरडीएचे विद्यमान आयुक्त योगेश म्हसे यांच्या जागी डॉ. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर मनपामध्ये नव्या आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Gold Rate
Mar 2nd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,67,000/-
Gold 22 KT ₹ 1,55,300/-
Silver/Kg ₹ 2,87,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२०११ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले डॉ. चौधरी यांची २०२३ मध्ये नागपूर मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासक म्हणून मनपाचे कामकाज पाहिले. त्यांच्या कार्यकाळात शहरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रस्ते विकास, जलनिस्सारण व्यवस्था, स्मार्ट सिटीअंतर्गत उपक्रम तसेच वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.

मात्र, त्यांच्या कार्यकाळात शहरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि काही विकासकामांच्या गुणवत्तेबाबत विरोधकांकडून तसेच नागरिक संघटनांकडून टीका देखील करण्यात आली. मनपा प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तरीही, प्रशासनिक समन्वय साधत विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न झाल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.

अलीकडेच पार पडलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुका देखील त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मनपा प्रशासनाने व्यापक नियोजन केले होते. ही प्रक्रिया प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, डॉ. चौधरी यांच्या बदलीनंतर नागपूर मनपाच्या पुढील आयुक्तपदाबाबत उत्सुकता वाढली आहे. नव्या आयुक्तांच्या नियुक्तीनंतर शहरातील प्रलंबित प्रकल्प आणि दैनंदिन प्रशासनाला कोणती दिशा मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement