
नांदेड : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज दुपारी भूकंपाचे हलके धक्के जाणवल्याची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी सुमारे ३ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान जमिनीखालून गडगडाटासारखा आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर काही क्षण जमीन थरथरल्याचा अनुभव ग्रामस्थांनी व्यक्त केला.
हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेड, धनज आणि परिसरातील इतर गावांमध्ये हे धक्के जाणवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडत मोकळ्या जागेत आश्रय घेतला. काही वेळ परिसरात घबराटीचे वातावरण होते.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.० इतकी नोंदवण्यात आली आहे. मुखेड तालुक्यातील खपराळा परिसर हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, जमिनीखालील खडकांच्या हालचालीमुळे साचलेला ताण अचानक मुक्त झाल्यास अशा प्रकारचे सौम्य धक्के जाणवू शकतात. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








