
मुंबई,: राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला नवी चालना देत महाराष्ट्र सरकारने टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत महत्त्वाचे सामंजस्य करार केले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या करार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या परिवर्तनासाठी स्वयंसेवी संस्थांची भागीदारी निर्णायक ठरणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. या करारांमुळे आरोग्य, पोषण, जलसंधारण, शेती, उपजीविका आणि ग्रामीण विकास यांसारख्या विविध क्षेत्रांतील उपक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रभावीपणे राबविले जाणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्य सेवा, पोषण, सुरक्षित पाणी आणि शाश्वत उपजीविका पोहोचविणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. टाटा ट्रस्टसोबत मागील दशकभर सुरू असलेली भागीदारी केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष कामातून समाजात सकारात्मक बदल घडविणारी आहे. नवजात बालक, माता, किशोरवयीन मुलं आणि कुपोषणग्रस्त घटकांसाठी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी हे करार मोलाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुर्धर आजारांवरील महागड्या उपचारांमुळे सामान्य कुटुंबांवर येणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अधिक बळकट केला जाणार आहे.
नागपूरमधील सहा नामांकित रुग्णालयांसोबतच्या करारांमुळे गरजू रुग्णांना सुलभ आणि परवडणारे उपचार उपलब्ध होणार आहेत. “उपचाराअभावी कुणाचाही जीव जाऊ नये, ही शासनाची भूमिका आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जलसंधारणाच्या क्षेत्रात नाम फाउंडेशनने केलेल्या कार्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे, नद्या-नाल्यांचे खोलीकरण आणि जलस्रोत पुनरुज्जीवन यांसारखी कामे प्रभावीपणे राबविल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार योजनेला लोकचळवळीचे रूप मिळण्यात स्वयंसेवी संस्थांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी महाराष्ट्र शासनासोबतची भागीदारी ही एकात्मिक विकासासाठीची धोरणात्मक पायरी असल्याचे सांगितले. आरोग्य, शिक्षण, पोषण, पाणी आणि स्वच्छता या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान व डिजिटल नवोपक्रमांच्या साहाय्याने परिणामकारक बदल घडविण्याचा ट्रस्टचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनीही जलसंधारणाच्या कामांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या करारांअंतर्गत माता व बाल आरोग्य सेवा बळकट करणे, कुपोषण व रक्तक्षयावर उपाययोजना, टेलिमेडिसिनच्या माध्यमातून दुर्गम भागांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, तलाव व जलकुंभ पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण वाढविणे, हवामान बदलांचा अभ्यास करून शेतीला दिशा देणे तसेच ग्रामीण व वनाधारित उपजीविकेला चालना देणे यांसारखे बहुआयामी उपक्रम राबविले जाणार आहेत.
टाटा ट्रस्टसोबत ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास विभागांसह विविध शासकीय यंत्रणांबरोबर एकूण १२ करार करण्यात आले आहेत. याशिवाय नाम फाउंडेशनसोबत जलसंधारण विभागाचा स्वतंत्र करार झाला आहे. या व्यापक भागीदारीमुळे महाराष्ट्राच्या विकास प्रवासाला नवे बळ मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.








