
नागपूर :देशसेवेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ऑपरेशन ‘सिंदूर’ दरम्यान केलेल्या कार्यासाठी फ्लाइट लेफ्टनंट प्रियांका खांडेकर यांना Air Officer Commanding-in-Chief Commendation Award जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान २६ जानेवारी २०२६ रोजी, प्रजासत्ताक दिनी प्रदान करण्यात आला.
मूळच्या नागपूरच्या रहिवासी असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट प्रियांका खांडेकर या VNIT, नागपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या पदवीधर आहेत. शिक्षणातील उज्ज्वल वाटचालीनंतर त्यांनी भारतीय वायुसेनेत प्रवेश करत राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारला.
त्यांचे वडील श्री. संतोष खांडेकर हे सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी, मोर्शी (अमरावती ग्रामीण) म्हणून कार्यरत आहेत. या गौरवाबाबत भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले,
“हा माझा गणवेशातील शेवटचा प्रजासत्ताक दिन आहे आणि याच दिवशी नियतीने माझ्या मुलीला सन्मानित केलं. स्वतः गणवेशात सेवा करणाऱ्या वडिलांकडून, राष्ट्रसेवेत उभी असलेली आपली लेक पाहणाऱ्या अधिक अभिमानी वडिलांपर्यंतचा हा प्रवास हा क्षण आयुष्यभर मनात कोरला जाईल.”
सध्या फ्लाइट लेफ्टनंट प्रियांका खांडेकर या पाकिस्तान सीमेवरील पठाणकोट येथे कार्यरत असून, त्यांच्या या यशामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात अभिमानाची लाट पसरली आहे. राष्ट्रसेवेसाठी समर्पित असलेल्या या लेकीने तरुण पिढीसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.








