नागपूर — नागपूर शहरातील वाठोडा परिसरात असलेल्या वृंदावनधाम, स्वामीनारायण मंदिर चौक येथे येत्या २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान श्रीमद्भागवत कथाचा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कथेसाठी श्री मलूकपीठाधीश्वर व आप्रपीठाधीश्वर परमपूज्य स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्य महाराज यांचे २८ जानेवारी रोजी नागपूरमध्ये आगमन होणार आहे.
हा धार्मिक कार्यक्रम श्रीमद्भागवत कथा महोत्सव समिती आणि ओमप्रकाश प्रल्हादराव अग्रवाल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. समितीचे कार्याध्यक्ष हर्ष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, परमपूज्य परमहंस श्री प्रज्ञानानंदजी महाराज यांच्या सानिध्यात स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज आपल्या ओघवत्या आणि अमृतमय वाणीतून भागवत कथांचे सखोल विवेचन करणार आहेत. या कथेसाठी परमपूज्य स्वामी श्री शुद्धानंदजी गिरि (पूर्णिधाम व अमरकंटक धाम) हे प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक आहेत.
स्व. नर्मदादेवी अग्रवाल, स्व. प्रल्हादराव अग्रवाल आणि सा. गीतादेवी अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कथामालिकेत श्री शुकदेव आगमन, ध्रुव चरित्र, नरसिंह अवतार, श्रीकृष्ण जन्म, गोवर्धन लीला, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह तसेच सुदामा चरित्र अशा महत्त्वपूर्ण कथाप्रसंगांचे सविस्तर वर्णन होणार आहे.
कथा दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार असून, नागपूरसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी शहरातील विविध धार्मिक व सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आणि स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
भाविकांनी या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









