
नागपूर :नागपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधून भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवत आपला बालेकिल्ला कायम राखला आहे. या प्रभागातून भाजपचे अधिकृत उमेदवार योगेश पाचपोर, रुतिका मसराम, वर्षा चौधरी आणि विजय होले हे चारही नगरसेवक निवडून आले असून, हा विजय म्हणजे आमदार मा. डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेली ठाम शिक्कामोर्तब असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काल, गुरुवारी मतदान पार पडले होते, तर आज मतमोजणी झाली. मतमोजणीत भाजपच्या चारही उमेदवारांनी स्पष्ट आघाडी घेत विजय संपादन केला. विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासोबत गुलाल उधळून आनंद साजरा केला व त्यांच्या नेतृत्वाबद्दल आभार मानले.
प्रभाग क्रमांक १३ हा आमदार डॉ. परिणय फुके यांचा पारंपरिक गड मानला जातो. प्रचाराच्या काळात त्यांनी प्रभागात सातत्याने सभा, पदयात्रा, मेळावे तसेच लहान-मोठ्या बैठका घेत मतदारांशी थेट संवाद साधला. प्रचाराच्या अवघ्या अकरा दिवसांत त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढत नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या व त्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले. भविष्यात प्रभागात विकासकामांसोबतच कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला होता.
प्रचारादरम्यान रामनगर चौकात आमदार डॉ. फुके यांच्या पुढाकाराने भव्य जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सभेतील प्रचंड गर्दी पाहता, डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्याचवेळी व्यक्त केला जात होता.
विशेष म्हणजे, हाच प्रभाग क्रमांक १३ यापूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुमारे २५०० मतांची आघाडी देणारा ठरला होता. तसेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सुमारे ३,३०० मतांची आघाडी मिळाली होती. मात्र, या महापालिका निवडणुकीत आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व राजकीय समीकरणे उलथवून लावत सुमारे ६,००० मतांच्या स्पष्ट आघाडीने विजय मिळवला. स्थानिक विकासकामांवर आधारित राजकारणाला मतदारांनी दिलेली ही ठोस पावती मानली जात आहे.
आमदार डॉ. परिणय फुके व माजी नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक १३ मध्ये एकूण १००८ घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढेही प्रलंबित पट्टे व घरकुलांचे प्रश्न मार्गी लावून पात्र लाभार्थ्यांना घरे मिळवून दिली जातील, अशी ग्वाही आमदार डॉ. फुके यांनी दिली. सिमेंट रस्ते, मूलभूत सुविधा, गोरगरिबांसाठी घरे यामुळे प्रभागाचा चेहरामोहरा बदलल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
आमदार डॉ. परिणय फुके यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले असता त्यांचे जनतेशी असलेले नाते अधिक ठळकपणे दिसून येते. २००७ साली त्यांनी प्रथमच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यानंतर २०१२ मध्ये सुमारे ४,००० मतांच्या आघाडीने ते पुन्हा निवडून आले. पुढे २०१७ मध्ये त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांनी सुमारे ६,००० मतांच्या आघाडीने विजय मिळवत प्रभागातील नेतृत्व अधिक मजबूत केले. या सातत्यपूर्ण यशामुळे प्रभाग क्रमांक १३ मध्ये डॉ. फुके कुटुंबावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येते.
यावेळी आमदार डॉ. परिणय फुके यांनी योगेश पाचपोर, रुतिका मसराम, वर्षा चौधरी आणि विजय होले या नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विकास, विश्वास आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर आमदार डॉ. फुके यांनी पुन्हा एकदा आपला गड राखल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.








