नागपूर – नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना महायुतीला मिळालेला अभूतपूर्व विजय हा महायुती सरकारने केलेल्या विकासकामांचीच ठोस पावती असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. या विजयामुळे नागपूरकरांनी विकासाच्या राजकारणावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके, संदीप जोशी, परिणय फुके यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे गडकरी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
नागपूरमध्ये आम्ही केलेल्या विकासकामांच्या बळावरच ही निवडणूक लढवली असल्याचे सांगत गडकरी म्हणाले की, नागपूरच्या जनतेने कोणत्याही घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामांना प्राधान्य दिले. विकासाला मत देत नागरिकांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास टाकला, यासाठी नागपूरकरांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
पुढील काळात नागपूरला देशातील सर्वांत स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त करत, या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये निश्चित यश मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र, राज्य आणि महापालिका समन्वयाने काम करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.









