
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सी परिसरातील प्रभाग क्रमांक ७ (ड) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमच्या टीमने प्रत्यक्ष मैदानात जाऊन नागरिकांशी संवाद साधला असता, मतदारांचा असंतोष आणि अपेक्षा स्पष्टपणे समोर आल्या.
या प्रभागातून भाजपचे उमेदवार नवनीत सिंह तुली यांच्याविषयी नागरिकांच्या मोठ्या वर्गात नाराजी दिसून येत आहे. मागील कार्यकाळात प्रभागात अपेक्षित विकासकामे झाली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, अनियमित पाणीपुरवठा, नाल्यांची साफसफाई नसणे, तसेच स्वच्छता व कचरा व्यवस्थापनातील त्रुटी या मूलभूत समस्या आजही कायम असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे “जमीनीवर कामच दिसलं नाही, तर पुन्हा उमेदवारी का?” असा प्रश्न मतदार विचारत आहेत.
दरम्यान, बहुजन समाज पार्टीकडून योगेश लांजेवार हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, याआधी त्यांच्या पत्नी मंगला लांजेवार या नगरसेवक असताना देखील प्रभागातील प्रश्न सुटले नाहीत, अशी आठवण नागरिक करून देत आहेत. त्या काळातही रस्ते, नाले, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न जैसे थे राहिल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.
काँग्रेसकडून युवा उमेदवार अभिषेक शंभकर हे मैदानात उतरले आहेत. शिक्षित असून गेल्या सुमारे दोन दशकांपासून ते सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे प्रयत्न तसेच महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठीच्या उपक्रमांमुळे त्यांची ओळख प्रभागात वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रभागात काँग्रेसची पकड भक्कम असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
एकूणच, लष्करीबाग प्रभाग क्रमांक ७ (ड) मधील वातावरण पाहता, यावेळी मतदार पक्षाच्या नावापेक्षा प्रत्यक्ष काम, अनुभव आणि जमीनीवरील कामगिरीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आता नागरिकांचा हा मूड मतदानाच्या दिवशी कोणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








